जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र कुस्तीच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना पहिल्यात दिवशी जोरदार अपयशाचा सामना करावा लागला आहे. आजपासून पॅरिस येथे अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे.  पहिल्याच दिवशी भारताच्या योगेश, गुरप्रीत सिंह, रविंदर खत्री आणि हरदीप या चारही मल्लांना ग्रेको-रोमन प्रकारात पराभूत व्हावं लागलं.

७१ किलो वजनी गटात योगेशला जपानच्या तकाशी इझुमीने ३-१ अशी मात दिली. तर ७५ किलो वजनी गटात गुरप्रीत सिंहला जॉर्जियाच्या मिंडीया तुसलुकित्झ ने ५-१ असं हरवलं. याव्यतिरीक्त ८५ किलो वजनी गटातही भारताच्या रविंदर खत्रीला हंगेरीच्या व्हिक्टोर लोरिनीकाने ८-० असं पराजित केलं. हा सामना इतका एकतर्फी झाला की व्हिक्टोरच्या खेळापुढे रविंदर खत्रीचा निभावच लागला नाही. तर हरदीपला लिथुनियाच्या विलीयस लाओरीनैतीसकडून ५-२ अशी हार पत्करावी लागली.

पहिल्याच दिवशी भारताच्या चारही कुस्तीपटूंना पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही भारतीयांच्या पदकाच्या आशा अजून संपलेल्या नाहीयेत. भारतीयांना हरवणाऱ्या मल्लांपैकी एकही मल्ल जर अंतिम फेरीत पोहचला तर त्याच्या प्रतिस्पर्धी भारतीय मल्लाला रेपीचाज प्रकारात कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळणार आहे.