दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत पाकिस्तानवर मात

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात जागतिक संघाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १७४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हशिम अमलाचे दमदार अर्धशतक आणि थिसारा परेराच्या आक्रमक खेळीच्या जोरावर जागतिक संघ विजयाच्या उंबरठय़ापर्यंत येऊन पोहोचला. अखेरच्या दोन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज असताना २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर परेराने षटकार खेचत सात विकेट्स राखून जागतिक संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह जागतिक संघाने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १७४ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. पहिल्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या बाबर आझमला या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही. पण पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा त्यानेच फटकावल्या. बाबरने ५ चौकारांच्या जोरावर ४५ धावा केल्या.

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमलाने एक बाजू लावून धरत संघाला विजयाची आशा दाखवली. अमलाने ५५ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. परेराने स्फोटक खेळी साकारताना १९ चेंडूंत पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : २० षटकांत ६ बाद १७४ (बाबर आझम ४५; थिसारा परेरा २/२३) पराभूत वि. जागतिक संघ : १९.५ षटकांत ३ बाद १७५ (हशिम अमला नाबाद ७२, थिसारा परेरा नाबाद ४७; मोहम्मद नवाझ १/२५).

सामनावीर : थिसारा परेरा