महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या ऑलिम्पिक मैदानात उतरण्याच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. ‘नाडा’ अर्थात नॅशनल अॅण्टी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत ५ जुलै रोजी पार पडलेल्या चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पहिल्या चाचणीत दोषी आढळल्यानंतर नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. नरसिंगची दुसरी चाचणी आज होणार होती, त्यानंतर नाडा अंतिम निर्णय देणार होते. नरसिंग या दुसऱ्या चाचणीमध्ये देखील दोषी आढळल्याने त्याच्या ऑलिम्पिकवारीचे स्वप्न भंगल्याचे आता निश्चत झाले आहे. त्याच्यावर झालेल्या कटकारस्थानाची चौकशी सुरु असून आरोप सिद्ध होण्याची प्रक्रिया होण्यास दिर्घकाळ लागणार असल्याने त्याचे खेळणे अशक्य असल्याचे क्रिडामंत्री विजय गोयल यांनी देखील स्पष्ट केले आहे.

नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकवारीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अर्थात नरसिंगच्या जेवणात भेसळ करणाऱ्या व्यक्तिच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधित  व्यक्ती आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार दाखल करताना नरसिंग यादव देखील हजर होता. दरम्यान, सोनीपतमध्ये सराव करण्याऐवजी मुंबईत सराव केला असता, तर या संकटात अडकलो नसतो, अशी प्रतिक्रिया नरसिंगने यावेळी दिली. नरसिंग उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणा याची निवड करण्यात आली आहे. प्रवीण राणा जॉर्जियातील प्रशिक्षणासाठी दाखल देखील झाला आहे. ७४ कलो फ्रि स्टाईल प्रकारात भारताचा कोटा खाली राहू नये, यासाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या विनंतीनंतर नरसिंगसोबत घडलेल्या घटनेला लक्षात घेऊन ऑलिम्पिक महासंघाने भारताला दुसरे नाव सामाविष्ट करण्याची संधी दिली होती. त्यानंतर २६ तारखेला प्रवीण राणाचे नाव ऑलिम्पिक संघटनेकडे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे विश्व पात्रता फेरीत प्रवीण राणाला पराभूत करुनच नरसिंगने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करत नरसिंगने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.