उत्तेजक घेतल्याच्या आरोपावरून रिओ ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत सहभागी होता न आलेल्या कुस्तीगीर पै. नरसिंग यादव याचा जीवनप्रवास गणेशोत्सवातील जिवंत देखाव्याद्वारे मांडण्यात येणार आहे. चिंचवड येथील गांधी पेठ तालीम मंडळाने यंदा नरसिंगवर आधारित १५ मिनिटांचा देखावा तयार केला आहे.
जवळपास ७५ वर्षांची परंपरा असलेल्या चिंचवडगावातील गांधी पेठ तालमीत अनेक मल्ल तयार झाले आहेत. पुढे याच नावाने सुरू झालेल्या सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. धार्मिक, सामाजिक, पौराणिक, प्रबोधनाचे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा असून यंदाच्या वर्षी मंडळाने कुस्तीक्षेत्राशी संबंधित देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला. नरसिंग यादववरून सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता या विषयाची सविस्तर माहिती नागरिकांना व्हावी, देखाव्यातून पैलवान होण्याचे प्रोत्साहन मिळावे, या हेतूने मंडळाने हा देखावा निश्चित केला आहे.
१५ मिनिटांच्या जिवंत देखाव्याद्वारे नरसिंगच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपदही नरसिंगने पटकावले होते.