अभिजित कटके या स्थानिक मल्लाने उस्मानाबादच्या दत्ता धनके याच्यावर अवघ्या पंधरा सेकंदात निर्णायक विजय मिळविला आणि खाशाबा जाधव करंडक राज्यस्तरीय युवा कुस्ती स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली.
फुलगाव येथील नेताजी बोस सैनिकी शाळेत सुरू असलेल्या या स्पर्धेत अभिजित याने सर्वोत्तम वेगवान विजय मिळविला. दत्ता धनके हा अभिजितपेक्षा ताकदवान मल्ल होता तथापि कुस्ती सुरू झाल्यानंतर काही कळायच्या आतच अभिजित याने हप्ता डाव टाकून दत्ता याला अस्मान दाखविले. त्याच्या झटपट विजयाने येथे उपस्थित असलेल्या शेकडो कुस्ती चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ९६ ते ११० किलो वजनी गटातील अन्य लढतीत उदयराज पाटील याने हृषिकेश किले याच्यावर १०-१ असा सफाईदार विजय मिळविला. दिगंबर कटके याने पुण्याच्या सिद्धेश खोपडे याच्यावर १०-० असा दणदणीत विजय नोंदवित आगेकूच राखली. बीडच्या नीळकंठ नागरगोजे याने आकाश तायडे या नागपूरच्या मल्लाला चीतपट केले. पुण्याच्या राजू तांगडे यानेही राहुल चौधरी (धुळे) याच्यावर निर्णायक विजय मिळविला.
सांगलीच्या दयानंद घोडके याने अपराजित्व राखताना ओंकार भातमार याला चीतपट करीत शानदार विजय मिळविला. नाशिकच्या अजिंक्य लगडे याच्याविरुद्ध उस्मानाबादच्या किरण मोरे याचा निभाव लागला नाही. अजिंक्य याने ही कुस्ती चीतपट जिंकली. सांगलीच्या हर्षवर्धन थोरात याने सातारा येथील खेळाडू पथिक माने याचा १०-० असा दणदणीत पराभव केला. कोल्हापूरच्या अनिरुद्ध पाटील याने लातूरच्या उदय शेळके याच्यावर १०-३ अशी मात केली.  
या स्पर्धेचा समारोप रविवारी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता होईल. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे.