महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या भेटीमुळे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय कुस्तीगिरांचा उत्साह द्विगुणित झाला.

ऑलिम्पिकसाठी निवड झालेले मल्ल ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, तेथे जाऊन सचिन याने त्यांना शुभेच्छा दिल्या. योगेश्वर दत्त (६५ किलो) व संदीप तोमर (५७ किलो) यांचा अपवाद वगळता अन्य सर्व मल्ल या वेळी उपस्थित होते. नरसिंग यादव (७४ किलो), रवींदर खत्री (८५ किलो), हरदीपसिंग (९८ किलो) या पुरुष खेळाडूंबरोबरच विनेश फोगट (४८ किलो), बबिताकुमारी (५३ किलो), साक्षी मलिक (५८ किलो) या महिला खेळाडूंबरोबरही सचिन याने हितगुज केले. या खेळाडूंसमवेत त्यांचे तीन प्रशिक्षक, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता, ऑलिम्पिकसाठी निवड झालेली टेबल टेनिसपटू मनिका बात्रा या वेळी उपस्थित होते.

‘मी भारताच्या भावी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना भेटलो. त्यांचा अनुभव ऐकण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच आहे’, असे सचिन म्हणाला.

रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकासाठी सचिन याला सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले आहे.