भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात पहिला कसोटी सामना खेळतो आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाने अवघ्या ११ धावांमध्ये ७ फलंदाज गमावले. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघावर टीका होत असताना यष्टिरक्षक वृद्धिमान साहाचे मात्र समाज माध्यमांवर कौतुक सुरु आहे.

पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने अतिशय सुंदर झेल टिपला. ८२ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वृद्धिमान साहाने उजव्या बाजूला झेपावत स्टिफन ओ’केफेचा अप्रतिम झेल टिपला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टिफन ओ’केफे शून्यावर बाद झाला. स्टिफन ओ’केफेच्या बॅटची कड घेऊन गेलेला यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सुरेखपणे हवेत झेपावत टिपला आणि ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला. यानंतर वृद्धिमानचे समाज माध्यमांवर प्रचंड कौतुक होते आहे. ‘हा वृद्धिमॅन की सुपरमॅन?,’ अशा शब्दांमध्ये समाज माध्यमांवर साहाच्या क्षेत्ररक्षणाची स्तुती करण्यात आली आहे.