भारतामध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. गुणवान खेळाडू मोठय़ा स्तरावर जाऊन भारताचे नाव उंचावतात, पण क्रिकेटला मिळणाऱ्या जास्त ग्लॅमरमुळे त्यांना कुणी ओळखतही नाही. त्यामुळे आता या वंचित खेळाडूंसाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूई’चे दालन खुले झाले आहे आणि आता त्यांना खुणावते आहे ते ग्लॅमर आणि प्रसिद्धीने भरलेले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ.

कविता देवी

‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या प्रशिक्षणामध्ये दाखल झालेली पहिली भारतीय महिला ठरली आहे ती पंजाबमधली कविता देवी. काही वर्षांपूर्वी मुलींना फार कमी लेखले जायचे, त्यामुळे घरातून तिच्या खेळाला विरोध होता. पण घरच्यांना न सांगता ती वेटलिफ्टिंग करत राहिली आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचली. त्यानंतर २०१६ साली तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकही कमावले. पण तिच्या वाटय़ाला काहीच आले नाही. तिने वेटलिफ्टिंग सोडले आणि ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मधील प्रख्यात कुस्तीपटू ‘खली’च्या प्रशिक्षण शिबिरामध्ये तिने सहभाग घेतला आणि आता आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये खेळण्यासाठी तयारी करत आहे.

1

लव्हप्रीत सिंग

वर्तुळ कबड्डीच्या दोन विश्वचषकांमध्ये लव्हप्रीत सिंगने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण विश्वचषक जिंकल्यावरही त्याला अपेक्षेप्रमाणे पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे यापूर्वी झालेल्या ‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या शिबिरामध्येही तो सहभागी झाला होता. आता त्याला या व्यासपीठावर चांगली ओळख मिळाली आहे. त्याचा चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्यामुळे त्याला आता चांगली ओळखही मिळाली आहे. त्याचबरोबर तो या प्रशिक्षण शिबिरातील खेळाडूंना काही प्रमाणात मार्गदर्शनही करतो.

रिंकू सिंग

आतापर्यंत नवी दिल्लीच्या रिंकूच्या आयुष्यात बरीच आव्हाने आली आणि त्यांना तो सामोरा गेला आहे. रिंकू सुरुवातीला अ‍ॅथलेटिक्स हा खेळ खेळत होता. त्यानंतर तो बेसबॉल खेळायला लागला आणि आता त्याला खुणावते आहे ते ‘डब्ल्यूडब्ल्यूई’चे रिंगण. या शिबिरात सर्वस्व झोकून देऊन तो सराव करत आहे आणि आता तिसऱ्या खेळात सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे.

2

सौरव गुज्जर

चंबळच्या खोऱ्यात एक तर राजकारणी तयार होतात किंवा गुन्हेगार, पण याच वातावरणात वाढला तो सौरव गुज्जर हा कुस्तीपटू. पण त्याला पहिली ओळख मिळाली ती खासगी वाहिनीने प्रसारित केलेल्या महाभारतातील ‘भीम’च्या भूमिकेमुळे. त्यानंतर त्याने खासगी मालिकेत रावणाचेही काम केले. या मालिकांमधून त्याला चांगली प्रसिद्धी मिळत होती, पण तरीही कुस्तीच्या आवडीपोटी त्याने ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.