विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता गुरुवारी फेटाळून लावली. तूर्ततरी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला विचार नसल्याचे धोनीने स्पष्ट केले.
सिडनीमध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषकानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यावर धोनीने लगेचच निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये आपण खेळत राहणार असून, टी-२० विश्वचषकानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.