राष्ट्रकुल स्पर्धेतील आठवा दिवस गाजवला तो भारतीय कुस्तीपटूंनी. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त आणि बबिता कुमारी यांनी फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र गीतिका झाकर हिला रौप्यपदकावर तर पवन कुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कलात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये दीपा कर्माकर हिने भारताला ऐतिहासिक असे कांस्यपदक मिळवून दिले.
कुस्ती
भारतीय मल्लांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदकांची परंपरा गुरुवारीही कायम राखताना दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली आहे. कुस्तीच्या अखेरच्या दिवशी ऑलिम्पिक पदकविजेत्या योगेश्वर दत्तने ६५ किलो वजनी गटामध्ये फ्री-स्टाइल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर महिलांमध्ये बबिता कुमारीने ५५ किलो वजनी गटामध्ये फ्री-स्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ६३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत गीतिका झाकरला पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत योगेश्वरने कॅनडाच्या जेव्हॉन बालफोरवर १.५३ मिनिटांमध्ये १०-० अशी निर्विवाद आघाडी घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. महिलांच्या अंतिम फेरीत ललिताने कॅनडाच्या ब्रिटनी लॅव्हरडय़ुरेवर ३-१ असा विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ललिताने रौप्यपदक कमावले होते. या लढतीमध्ये बबिताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. लढत संपायला १५ सेकंद असताना ब्रिटनीने एकमेव गुण कमावला.
 गीतिका झाकरला महिलांच्या ६३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या डॅनिले लॅपॅकेकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न हुकले. पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटात पवन कुमारने पाकिस्तानच्या मोहम्मद इनानला हरवून कांस्यपदक पटकावले.
जिम्नॅस्टिक्स
दीपा कर्माकरला ऐतिहासिक कांस्य
युवा जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकरने ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणारी दीपा ही पहिली महिला भारतीय जिम्नॅस्टिकपटू ठरली आहे. २० वर्षीय दीपाने कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४.३६६ गुण कमावत कांस्यपदक पटकावले. इंग्लंडच्या क्लाऊडिया फ्रॅगपानने १४.६३३ गुणांसह सुवर्णपदक तर इसाबेथ ब्लॅकने १४.४३३ गुणांसह रौप्यपदक मिळवले. २०१०च्या राष्ट्रकुलमध्ये जिम्नॅस्टिक प्रकारात पदक मिळवणारा आशिष कुमार हा पहिला भारतीय ठरला होता.
बॉक्सिंग
विजेंदरसह पाच जणांचे पदक निश्चित
ऑलिम्पिक आणि जागतिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगसह पाच बॉक्सर्सनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत धडक मारीत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
विजेंदर (७५ किलो), मनदीप जांगरा (६९ किलो) आणि एल. देवेंद्र सिंग (४९ किलो) यांनी पुरुष गटात वर्चस्व गाजवले, तर एल. सरिता देवी (६० किलो) आणि पिंकी जांगरा (५१ किलो) यांनी महिला गटात विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या विजेंदरने त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या आरोन प्रिन्सवर ३-० अशी सरशी साधली. ‘‘ही खडतर लढत होती. मी प्रतिस्पध्र्याला कमी लेखले नाही. आता उपांत्य फेरीत मला सर्वोत्तम कामगिरी साकारावी लागणार आहे. सुवर्णपदकासाठी लढत द्यायची आहे, हे उद्दिष्ट बाळगूनच मला खेळावे लागणार आहे,’’ असे विजेंदर म्हणाला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या देवेंद्रने स्कॉटलंडच्या अकील अहमदचे आव्हान परतवून लावले. मनदीपने दोन लढती जिंकत आगेकूच केली. पुरुषांच्या ९१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अमरित सिंगला स्कॉटलंडच्या स्टीफन लॅवेलेकडून ०-३ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मणिपूरच्या अनुभवी बॉक्सर सरिता देवीने वेल्सच्या चार्लेन जोन्स हिच्यावर ३-१ अशी सरशी साधली. तिला शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत मोझाम्बिकच्या मारिया माचोंगुआ हिचा सामना करावा लागेल. युवा बॉक्सर पिंकीने जॅकलिन वांगी हिला ३-० असे सहज पराभूत केले.
बॅडमिंटन
कश्यप, गुरुसाईदत्त, तुलसीची आगेकूच
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप, आरएमव्ही गुरुसाईदत्त, आणि पी. सी. तुलसी यांनी सुरेख कामगिरी साकारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. कश्यपने पुरुषांच्या एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेफ थो याला २१-७, २१-८ असे सहज पराभूत केले. पुढच्या सामन्यात कश्यपसमोर डेव्हिड लिअूचे आव्हान असणार आहे. गुरुसाईदत्तने कॅनडाच्या अ‍ॅन्ड्रय़ू डिसुझावर २१-१३, २१-९ असा सहज विजय मिळवला. गुरुसाईदत्तची पुढची लढत मलेशियाच्या चोंग वेई फेंगशी होणार आहे. तुलसीने कॅनडाच्या रचेल होंडेरिच हिला २१-१२, २१-७ असे सहज नमवले. तुलसीचा पुढचा मुकाबला जिंग यि ती हिच्याशी होणार आहे.
हॉकी
द. आफ्रिकेला हरवून भारत उपांत्य फेरीत
अखेरच्या साखळी लढतीमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-२ अशा फरकाने हरवून राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. दोन गोल झळकावणारा रुपिंदर पाल सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने पहिल्याच सत्रात ४-० अशी आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात द. आफ्रिकेने दोन गोल करून सामन्यात परण्याचा प्रयत्न केला. भारतानेही आणखी एक गोल झळकावला.
भारताकडून व्ही. आर. रघुनाथ (९व्या मि.), रुपिंदर पाल सिंग (९, २२व्या मि.), एस. व्ही. सुनील (२६व्या मि.) आणि मनप्रीत सिंग (५८व्या मि.) यांनी गोल साकारले. तर द. आफ्रिकेकडून टायने पॅटन (४२व्या मि.) आणि ऑस्टिन स्मिथ  (४७व्या मि.) यांनी गोल केले.
टेबल टेनिस
मानिकाची घोडदौड
भारताची युवा टेबल टेनिसपटू मानिका बात्राने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कॅनडाच्या अ‍ॅन्की ल्युओला ११-१३, ११-७, ८-११, ११-२, ११-७, ११-९ असे हरवले. शरथ कमलाने पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.  मिश्र दुहेरीत शरथ-शामिली कुमारसेन या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड पॉवेल आणि जियान फँग ले जोडीचा ११-६, ८-११, ४-११, १३-११, ११-७ असा पराभव केला.
स्क्वॉश
सौरव-हरिंदर जोडीचे आव्हान संपुष्टात
सौरव घोषाल आणि हरिंदर पाल संधू या स्क्वॉशपटूंचे  आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. स्टुअर्ट क्रॉफर्ड आणि ग्रेग लोबान जोडीने सातव्या मानांकित सौरव-हरिंदर जोडीवर ११-५, ८-११, ११-९ असा विजय मिळवला. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकवण्याच्या सौरवच्या आशा आता मिश्र दुहेरीवर केंद्रित झाल्या आहेत.