रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू योगश्वर दत्तची निराशा झाली असली तरी लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला मिळालेले कांस्यपदक रौप्य पदकात रुपांतरीत होण्याची शक्यता असताना योगेश्वरने मात्र हे पदक नाकारले आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्य पदक पटकावले होते. या लढतीत रौप्य पदक मिळवलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सर्वांनी योगेश्वरचे कौतुक देखील केले. योगेश्वरने बुधवारी याबाबत बोलताना ‘जे नशिबात लिहीलेले असते तेच होते’, अशी प्रतिक्रिया देऊन आपल्याला मिळणारे रौप्यपदक राष्ट्राला समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आज योगेश्वरने आपण रौप्यपदक नाकारात असल्याचे विधान सोशल मीडियावर अकाऊंट्सवर केले आहे.

वाचा: जे नशिबात लिहिलेले असते तेच होते- योगेश्वर दत्त

लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलोग्रॅम फ्री स्टाइल वजनी गटात रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला रौप्यपदक मिळाले होते. पण तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. कुदुखोवचा २०१३ साली वयाच्या २७ व्या वर्षी रशियामध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे कुदुखोवच्या कुटुंबियांकडेच रौप्यपदक असावे, त्यांच्याकडून रौप्यपदक घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे ट्विट योगेश्वरने केले आहे. योगेश्वर म्हणाला की, कुदुखोव हे महान कुस्तीपटू होते. त्यांच्या मृत्यूनंतर ते उत्तेजक चाचणीत दोषी आढळणे दुर्देवी आहे. मी एक खेळाडू म्हणून त्यांच्या खूप आदर करतो. माझ्यासाठी माणुसकी हा सर्वात मोठा सन्मान आहे. त्यामुळे शक्य असेल तर त्यांचे रौप्यपदक त्यांच्या कुटुंबियांकडेच रहावे.

रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यापूर्वी आयओसीने लंडन ऑलिम्पिक दरम्यानच्या खेळाडूंच्या सॅम्पलची पुन्हा एकदा तपासणी केली होती. हे सॅम्पल १० वर्षांपर्यंत ठेवले जाते. जर एखाद्या खेळाडूने चुकीच्या पद्धतीने यश मिळवले असेल तर या चाचणीतून ते समोर येईल असा आयओसीचा उद्देश आहे. या नियमांतर्गतच कुदुखोव्हच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे रौप्य पदक योगेश्वर दत्तला मिळणार आहे.