पुल्लेला गोपीचंद यांचा शिष्य असलेल्या किदम्बी श्रीकांतने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावणाऱ्या श्रीकांतला साक्षात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शाबासकी दिली आहे. तू क्रमवारीत अव्वल स्थान गाठू शकतोस, असे सचिनने आपल्याला सांगितल्याचे श्रीकांत या वेळी म्हणाला. श्रीकांतची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी इंडोनेशियाला रवाना होण्यापूर्वी श्रीकांतने सचिनची भेट घेतली. श्रीकांतचे काका सचिनच्या मित्रपरिवारापैकी आहेत. त्यांच्या निवासस्थानी या युवा बॅडमिंटनपटूने सचिनची भेट घेतली.
‘‘माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. मला पाच-सात मिनिटे सचिनशी बोलण्याची संधी मिळाली. मी लवकरच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावेन असे त्याने सांगितले. सचिनसारख्या महान खेळाडूचे उद्गार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत,’’ असे श्रीकांतने सांगितले.
अर्जुन पुरस्काराविषयी विचारले असता श्रीकांत म्हणाला, ‘‘यंदाच्या वर्षांत माझी कामगिरी चांगली झाली आहे. हा पुरस्कार मोठा सन्मान आहे. पुरस्काराने आत्मविश्वासाला बळ मिळाले आहे आणि जबाबदारीही वाढली आहे. बॅडमिंटन खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मला अर्जुन पुरस्काराबद्दल कल्पनाच नव्हती. मी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केल्यानंतर पारुपल्ली कश्यपला या पुरस्काराने गौरवण्यात आले. अश्विनी पोनप्पा, पी. व्ही. सिंधू यांनाही सन्मानित करण्यात आले. जर माझी कामगिरी सातत्याने चांगली झाली तर मलाही हा पुरस्कार मिळेल याची खात्री होती.’’
‘‘रिओ ऑलिम्पिकसाठी अत्यंत कमी वेळ बाकी आहे. मात्र ऑलिम्पिकपुरता विचार करण्यापेक्षा आगामी स्पर्धामध्ये दमदार कामगिरीसाठी प्रयत्नशील आहे,’’ असे श्रीकांतने सांगितले.