विदर्भाचा सामना बडोद्याशी; केरळशी दोन हात करण्यास मुंबई उत्सुक
सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा
ट्वेन्टी-२० विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या सर्वोत्तम स्पर्धेत संधी मिळवण्यासाठी युवा खेळाडूंना सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेचे व्यासपीठ मिळाले असून या स्पर्धेची बाद फेरी शुक्रवारपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहे. हे सामने वानखेडे आणि शरद पवार स्टेडियमवर होणार आहेत.
मुंबईचा पहिला सामना केरळविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, त्यापूर्वी विदर्भ आणि बडोदा यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या हंगामात श्रेयस अय्यरने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कर्णधार आदित्य तरे, सूर्यकुमार याव, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर यांच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा संघाला असेल. गोलंदाजीमध्ये शार्दूल ठाकूरने या हंगामात सातत्यपूर्ण भेदक कामगिरी केली आहे. केरळ संघातील संजू सॅमसनच्या खेळावर साऱ्यांचे लक्ष असेल.
या संधीचा फायदा घेण्यासाठी बडोद्याचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ा उत्सुक आहे. पंडय़ाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तो ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आतुर असेल. दिल्लीच्या संघाचे नेतृत्व गौतम गंभीरकडे देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद भूषवताना त्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारतीय संघाचे दार ठोठावण्यासाठी गंभीर आतुर असेल.