पाकिस्तान संघाचा भरवशाचा आणि अनुभवी फलंदाज युनिस खान याने शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकरला पिछाडीवर सोडत नवा विक्रम प्रस्थापित केला. अबुधाबी मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात दुखापतीमधून सावरत पुनरागमन करणाऱ्या युनिस खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले ४० वे शतक साजरे केले. त्याच्या या शतकामुळे वयाच्या पस्तीशीनंतर सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम युनिस खानच्या नावावर झाला आहे. वयाच्या पस्तीशीनंतर भारताची भिंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राहुल द्रविडने ४७ कसोटीत १२ शतके ठोकली होती. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर शतके ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या पस्तीशीनंतर ५२ कसोटीत १२ शतके झळकवली आहेत. याव्यतिरिक्त इंग्लडचा ग्रॅहम गुच याने ५२ कसोटीत १२ शतके ठोकली आहेत. तर इंग्लडच्या जेफ्री बॉयकॉटने ४५ कसोटी खेळताना १० शतके ठोकली आहेत.

या शतकानंतर युनिस खान पाकिस्तानकडून सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक ३३ शतके कसोटीमध्ये केली आहेत. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर, श्रीलंकेचा भरवशाचा फलंदाज महिला जयवर्धने आणि वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ब्रायन लारा याच्या कसोटी क्रिकेटमधील शतकांशी बरोबरी करण्यासाठी युनिस खानला फक्त आणखी एका शतकाची आवश्यकता आहे. या तीन दिग्गजांच्या नावावर कसोटीमध्ये ३४ शतके आहेत.
शतकांचा अनोखा विक्रम आपल्या नावावर करणारा युनिस खान वयाच्या पस्तीशीनंतर ३००० धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. पस्तीशीनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लडचा माजी कर्णधार ग्रॅहम गुच याच्या नावावर आहे. ग्रॅहमने पस्तीशीनंतर ४५६३ धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे.