पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर पाच विकेट राखून मात
पहिल्या तीन कसोटी सामन्यांत सातत्य न राखल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आलेल्या युवराज सिंगने ट्वेन्टी-२० प्रकारातील आपले नाणे मात्र खणखणीत सिद्ध केले. गहुंजेच्या सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात युवराजचाच ‘सहारा’ भारतीय संघाला तारणारा ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच भारताला पाच विकेट आणि २.१ षटके बाकी राखून सामनाजिंकता आला. युवराजने गोलंदाजीत तीन बळी घेतले आणि त्यानंतर आक्रमक ३८ धावा करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
सहारा स्टेडियमवर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असूनही आयपीएलइतका उत्सुकता क्रिकेटरसिकांनी दाखवली नाही.  आयपीएल सामन्याइतका जोशही पाहायला मिळाला नाही. भारताच्या फलंदाजीच्या वेळी मात्र उत्साह दिसून आला.
नाणेफक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारताचे बिनीचे गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर युवराजनेच भारतीय गोलंदाजीची सूत्रे स्वीकारली. त्याने चार षटकांत केवळ १९ धावांमध्ये तीन बळी घेतले. इंग्लंडने या सामन्यासाठी ट्वेन्टी-२० स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये माहीर असलेल्या युवा खेळाडूंना स्थान दिले होते. मात्र अ‍ॅलेक्स हेल्स, ल्युक राइट व  जोस बटलर हे तीनच फलंदाज त्यांच्याकडून आत्मविश्वासाने खेळ करू शकले. हेल्सने झंझावती खेळ करीत ३४ चेंडूंत ५६ धावा करताना दोन षटकारांबरोबरच सात चौकारही मारले. राइटने एक षटकार व तीन चौकारांसह ३४ धावा केल्या. बटलरने नाबाद ३३ धावांमध्ये तीन षटकार मारुन प्रेक्षकांना फटकेबाजीचा आनंद मिळवून दिला.
भारतीय गोलंदाजीतील मर्यादा आज स्पष्ट दिसून आल्या. पहिल्या नऊ षटकांत भारताने सात गोलंदाजांचा उपयोग केला. युवराज यशस्वी होत असतानाच अन्य गोलंदाजांनी अपेक्षेइतकी प्रभावी गोलंदाजी केली नाही. शेवटच्या पाच षटकांत भारतीय गोलंदाजांनी ४४ धावा दिल्या.
विजयासाठी १५८ धावांच्या माफक आव्हानास सामोरे जाताना भारताची सुरुवात चांगली झाली. गौतम गंभीर व अजिंक्य रहाणे यांनी सलामीसाठी ४.३ षटकांमध्ये ४२ धावा जमविल्या. मात्र ही जोडी पाठोपाठ बाद झाल्यानंतर युवराजने विराट कोहलीच्या साथीने दमदार फलंदाजी केली. त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे प्रेक्षकांना युवीच्या जुन्या शैलीची आठवण झाली. त्याचा खेळ रंगत असतानाच उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. युवीने तीन षटकांराबरोबरच दोन चौकार मारुन ३८ धावा केल्या. त्याने कोहलीच्या साथीत केलेली ४९ धावांची भागीदारीही महत्त्वपूर्ण ठरली. साथीदार गमावणाऱ्या कोहलीनेही लगेचच तंबूचा रस्ता पकडला. तो २१ धावांवर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर कर्णधार महेद्रसिंग धोनीने सुरेश रैनाच्या साथीत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. रैनाने नेहमीचा सफाईदार खेळ करीत २६ धावा केल्या. आत्मविश्वासाने खेळ करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने नाबाद २४ धावा केल्या.
संक्षिप्त निकाल
इंग्लंड : २० षटकांत ६ बाद १५७ (अ‍ॅलेक्स हेल्स ५६, ल्युक राईट ३४, जोस बटलर नाबाद ३३; युवराजसिंग ३/१९, अशोक दिंडा २/१८) पराभूत वि. भारत : १७.५ षटकांत ५ बाद १५८   (युवराजसिंग ३८, विराट कोहली २१, सुरेश रैना २६, महेद्रसिंग धोनी नाबाद २४; टीम ब्रेस्नन २/२६),
सामनावीर : युवराज सिंग.    

‘त्या’ दुर्दैवी मुलीला विजय अर्पित -युवराज
पुणे : नवी दिल्लीतील बलात्काराची घटना अत्यंत लाजिरवाणी व मानवतेला काळिमा फासणारी आहे. मला आज जे यश मिळाले आहे, ते मी ‘त्या’ दुर्दैवी मुलीला अर्पित करतो, असे युवराजसिंग याने सामना संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
दिल्लीतील घटनेमुळे मी अत्यंत दु:खी झालो आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये असे मी एक क्रिकेटपटू म्हणून सर्वाना आवाहन करीत आहे. या घटनेमधील दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, तरच मला सुख लाभेल, असेही युवराजने सांगितले.
तो पुढे म्हणाला, पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीचा सामनावीर पुरस्कार माझ्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. खेळाडूंना लोक आदर्श मानतात मग आमची सर्वाना विनंती आहे की लोकांनी असे अमानवी कृत्य करू नये.      

गहुंजे नगरीतून
आयपीएलची क्रेझ आंतरराष्ट्रीय सामन्याला नाही!
गहुंजे स्टेडियमवर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे येथे कमालीची क्रेझ पहावयास मिळेल अशी अपेक्षा होती. विशेषत: गतवर्षी येथे झालेल्या नऊ आयपीएल सामन्यांच्या वेळी क्रिकेट चाहत्यांमध्ये अफाट उत्साह दिसायचा तो उत्साह गुरुवारी पहावयास मिळाला नाही. आयपीएलच्या सामन्यांप्रसंगी प्रेक्षक तीन-चार तास अगोदर मोठय़ा रांगा लावत असत. तो उत्साह पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याला दिसून आला नाही. सामना सुरू झाला तरी स्टेडियम जेमतेम निम्मेच भरले होते. कसोटीतील भारताचा पराभव व महागडी तिकिटे यांचा परिणाम प्रेक्षकांच्या उपस्थितीवर दिसून आला. टी-शर्ट्स, जर्सी व ध्वजविक्रीस आयपीएलप्रमाणे प्रतिसाद लाभला नाही. तसा जल्लोषही मैदानावर पाहायला मिळाला नाही.    

मोठा अनर्थ टळला!
सामन्यासाठी प्रसारमाध्यमांकरिता विशेष कक्ष तयार करण्यात आला होता. सामना सुरू होण्यापूर्वीच या कक्षात दोन वेळा शॉर्टसर्किट झाले. त्यामध्ये या कक्षात ठेवण्यात आलेला मोठा टीव्ही स्क्रीन आणि एका स्पीकरचे खूप नुकसान झाले. प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रतिनिधींच्या लॅपटॉपचे अ‍ॅडप्टरही जळाले.    

निवड समिती अध्यक्षच स्थानासाठी झगडले!
भारतीय क्रिकेटमध्ये निवड समिती सदस्यांना मानाचे स्थान आहे. परंतु गहुंजे स्टेडियमवरमात्र निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांना प्रारंभी बसायला योग्य जागा मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या पाटील यांनी आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी कापरेरेट कक्षात पाटील यांना जागा दिली.