गतविजेत्या यू मुंबाने दबंग दिल्लीला चारी मुंडय़ा चीत करीत स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करणारा रिशांक देवाडिगा यू मुंबाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. याचप्रमाणे बंगळुरू बुल्सने घरच्या मैदानावर पहिल्या विजयाची नोंद करताना जसवीर सिंगच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सचा ३६-२६ असा धुव्वा उडवला. बंगळुरूकडून अमित राठी आणि आशीष सांगवान यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
बंगळुरूच्या श्री कांतीराव स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात यू मुंबाच्या आक्रमण आणि बचावामुळे दुबळ्या दिल्लीचा निभाव लागला नाही. यू मुंबाने अनुक्रमे नवव्या आणि ३३ व्या मिनिटाला असे दोन लोण चढवले. मध्यंतराला मिळवलेली १६-७ अशी आघाडी मुंबईने अखेपर्यंत ३०-१७ अशी टिकवली. दिल्लीचा हा स्पध्रेतील सलग चौथा पराभव ठरला. यू मुंबाच्या रिशांकने चढायांचे ५ आणि पकडींचे ३ गुण मिळवले. त्याला कर्णधार अनुप कुमारच्या हुकमी चढाया आणि मोहित चिल्लरच्या नेत्रदीपक पकडींची सुरेख साथ लाभली. दिल्लीचा भरवशाचा खेळाडू काशिलिंग आडकेलाही फारसे यश मिळाले नाही. त्याने १० चढायांमध्ये फक्त २ गुण मिळवले, तर त्याच्या दोनदा पकडी झाल्या. याचप्रमाणे सुरजित सिंगलाही १० चढायांत फक्त २ गुण मिळवता आले, त्याच्या चार वेळा पकडी झाल्या.

आजचे सामने
यू मुंबा वि. पाटणा पायरेट्स
बंगळुरू बुल्स वि. तेलुगू टायटन्स
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३.