सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून रंगणार

ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिकेत खेळण्यापूर्वी अनुभवी युवराज सिंग, हरभजन सिंग आणि आशीष नेहरा यांची शनिवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत कसोटी लागणार आहे.

युवराज आणि नेहराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघात स्थान पक्के करण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करणे क्रमप्राप्त असेल.

फेब्रुवारी महिन्यात आयपीएलचा लिलाव होणार आहे. त्यामुळे चार शहरांत होणाऱ्या मुश्ताक अली स्पध्रेद्वारे आयपीएलमधील विविध संघांचे लक्ष वेधण्याची संधी उदयोन्मुख क्रिकेटपटूंना असेल.

कर्णधार हरभजन आणि युवराजच्या पंजाबची कोची येथे राजस्थानशी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे साडेचार वर्षांनी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या नेहराच्या दिल्लीची रेल्वेविरुद्ध लढत होणार आहे. सुरेश रैनालासुद्धा आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. रैनाच्या उत्तर प्रदेशचा कटक येथे महाराष्ट्राशी सामना होणार आहे.

बंगालाचा संघ १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अष्टपैलू खेळाडू लक्ष्मीरतन शुक्लाशिवाय खेळणार आहे. शुक्लाने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली

आहे. नागपूरला बंगाल-हैदराबाद सामना होणार आहे. बंगालचा कर्णधार मनोज तिवारी आणि अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा यांना अनुक्रमे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात स्थान मिळाले आहे.

सामने

नागपूरमध्ये (अ-गट)

बंगाल वि. हैदराबाद

गुजरात वि. हिमाचल प्रदेश

हरयाणा वि. तामिळनाडू

कोचीमध्ये (ब-गट)

राजस्थान वि. पंजाब

केरळ वि. जम्मू आणि काश्मीर

सौराष्ट्र वि. त्रिपुरा

बडोदा (क-गट)

आंध्र प्रदेश वि. मध्य प्रदेश

आसाम वि. बडोदा

दिल्ली वि. रेल्वे

कटकमध्ये (ड-गट)

मुंबई वि. ओदिशा

कर्नाटक वि. सेनादल

महाराष्ट्र वि. उत्तर प्रदेश