युवराज सिंग संपलेला नाही, याचाच प्रत्यय त्याने धडाकेबाज शतक झळकावून दिला. त्यामुळेच पंजाबने महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ८ बाद ३७० धावा केल्या. महाराष्ट्राने पहिल्या डावात २१० धावा केल्या आहेत.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात सोमवारचा दिवस युवराजनेच गाजविला. त्याने १६८ चेंडूंत १३६ धावा करताना मैदान दणाणून सोडले. त्याने जीवनज्योत सिंग (६८) याच्या साथीने ११२ धावांची भागीदारी केली. तसेच त्याने गुरकिराट सिंग (५७) याच्यासोबतही ११२ धावांची भर घातली. दिवसअखेपर्यंत पंजाबने पहिल्या डावात १६० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली आहे.
पंजाबने १ बाद २६ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र त्यांनी अमितोझ सिंग (१६) व मनदीप सिंग (१०) यांना लवकर गमावले. त्यावेळी त्यांची ३ बाद ५४ अशी दयनीय स्थिती होती. तथापि, युवी मैदानात आला आणि खेळाचा नूरच पालटला. त्याने आत्मविश्वासाला आक्रमक खेळाची जोड देत चौफेर फटकेबाजी केली. त्याला सलामीवीर जीवनज्योतनेही यथार्थ साथ दिली. त्यांनी २५ षटकांत ११२ धावांची भर घातली आणि संघाचा डाव सावरला. या भागीदारीने खेळाचे पारडे पंजाबच्या बाजूने झुकले गेले. जीवनज्योतने अर्धशतक टोलवले, मात्र ६८ धावांवर तो तंबूत परतला. त्याने सात चौकार मारले. युवराज व गुरकिराट यांचीही जोडी झकास जमली. त्यांनीही शतकी भागीदारी करताना महाराष्ट्राची गोलंदाजी निष्प्रभ केली. युवराजने १२८ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने १६० चेंडूंमध्ये २५ चौकार व एक षटकारासह १३६ धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने कलात्मक खेळ करीत आपला ‘फॉर्म’ अजूनही कायम आहे, याचा प्रत्यय घडविला. गुरकिराटने नऊ चौकारांसह ५७ धावा टोलवल्या. शेवटच्या फळीत गीतांश खेरा (नाबाद ३७) व हरभजन सिंग (३१) यांनीही आक्रमक खेळ करीत संघाला साडेतीनशे धावांपलीकडे नेले.
महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचा याने सर्वाधिक तीन बळी घेतले. सामन्याचे दोन दिवस अजून बाकी असल्यामुळे सामना निकाली होणार हे स्पष्ट झाले आहे.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : २१०
पंजाब (पहिला डाव) : ९३ षटकांत ८ बाद ३७० (जीवनज्योत सिंग ६८, युवराज सिंग १३६, गुरकिराट सिंग ५७, गीतांश खेरा खेळत आहे ३७, हरभजनसिंग ३१; अनुपम संकलेचा ३/७५, समाद फल्लाह २/७२)