विश्वचषक म्हणजे क्रिकेटविश्वाचा मानबिंदू. दर चार वर्षांनी रंगणाऱ्या या क्रिकेटच्या महासोहळ्यात सहभागासह सर्वोत्तम प्रदर्शन करावे अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. २०१५चा विश्वचषक आता दीड महिन्यावर आला असून, मंगळवारी निवड समिती विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. विश्वचषकाचे तिकीट मिळवण्यात सर्वाधिक चर्चा आहे युवराज सिंगच्या नावाची.
कर्करोगाशी लढा दिल्यानंतर युवराज सिंगने जिद्दीने पुनरागमन केले. मात्र फॉर्म आणि दुखापती यांनी युवराजच्या कारकीर्दीला ग्रहण लावले. यामुळे २०११ विश्वचषकात मालिकावीराचा किताब पटकावणाऱ्या युवराजला बीसीसीआयने वर्षभरासाठीच्या श्रेणीबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीतून वगळले. यामुळे युवराजची कारकीर्द संपली असा होरा तज्ज्ञांनी व्यक्त केला. मात्र रणजी स्पर्धेतील शानदार कामगिरी, अष्टपैलू रवींद्र जडेजाला झालेली दुखापत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या मुद्दय़ांच्या बळावर युवराजचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. विशेष म्हणजे विश्वचषकासाठी संभाव्य ३० खेळाडूंच्या यादीतही युवराजच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता.
गेल्या वर्षभरात अष्टपैलू कामगिरी करत छाप उमटवणाऱ्या अक्षर पटेलला अंतिम पंधरा खेळाडूत स्थान मिळणार का, याचीही उत्सुकता आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघात सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा यांच्यासह मधल्या फळीतील विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे यांचे स्थान पक्के मानले जात आहे. प्रमुख फिरकीपटू म्हणून रवीचंद्रन अश्विनच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, वरुण आरोन यांच्यात चुरस आहे. अष्टपैलू भुवनेश्वर कुमारचा समावेश औपचारिकता आहे. स्थानिक सामन्यात चांगली कामगिरी करणारा विनय कुमारही शर्यतीत आहे.
अष्टपैलू खेळाडूच्या जागेसाठी स्टुअर्ट बिन्नीला संधी मिळू शकते. राखीव फलंदाज म्हणून अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांच्यात स्पर्धा आहे. यष्टीरक्षक धोनीला पर्याय म्हणून नमन ओझा, वृद्धिमान साहा आणि जबरदस्त फॉर्मात असलेला रॉबिन उथप्पा या त्रिकुटात चुरस आहे.