भारतीय संघाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने कटकमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जवळपास सहा वर्षांनंतर एकदिवसीय शतक साजरे केले. विश्वचषक विजेत्या संघात महत्त्वाची कामगिरी केलेल्या युवीला तब्बल सहा वर्षांनंतर एकदिवसीय संघात संधी मिळाली. युवराजने मिळालेल्या संधीचे सोने करत मोठ्या आत्मविश्वासाने पुनरागमन केले. युवराजला या पुनरागमनासाठी आजवर अनेक अडथळ्यांवर मात करून इथवर यावे लागल्याचे त्याने आज शतक साजरे केल्यानंतर सेलिब्रेशनमध्ये स्पष्ट दिसून आले. युवराज शतक गाठल्यानंतर  प्रचंड भावूक झाला होता. शतक गाठल्यानंतर त्याचे डोळे पाणावले.

विश्वचषक जिंकल्यानंतर युवराजने कॅन्सरशी दोन हात केले. यादरम्यान त्याला संघातील स्थान गमवावे लागले. कॅन्सरवर मात केल्यानंतर युवीने पुनरागमनासाठी खडतर प्रयत्न केले आणि पाच वर्षे नऊ महिन्यांनी त्याला भारताच्या एकदिवसीय संघात संधी मिळाली. युवीने मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील आजवरची सर्वोत्तम खेळी साकारली. युवराजने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दीडशे धावा ठोकल्या. युवराज आणि धोनीने याआधी २०११ सालच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ५० हून अधिक धावांची भागीदारी रचून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर थेट आज युवी-धोनी ही जोडगोळी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दोघांनी तुफान फटकेबाजी करत इंग्लंडसमोर ३८१ धावांचा डोंगर उभारला. युवराजने आपल्या १५० धावांच्या खेळीत २१ चौकार आणि तीन षटकार ठोकले.