भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकून दिल्यानंतर कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगाशी दोन हात करून वयाच्या ३५ व्या वर्षी भारतीय एकदिवसीय संघात दमदार पुनरागमन करणे खरंच खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे युवराजला जिगरबाज हे प्रत्यय अतिशय योग्य ठरते. युवराजने इंग्लंडविरुद्धच्या कटक वनडेत आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम १५० धावांची खेळी साकारली आणि आपण आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी कुवत असल्याचे सिद्ध करून दाखवले. कॅन्सरसारख्या रोगाशी युवराजची गाठ पडल्यानंतर त्याचे संघात पुनरागमन होणे जवळपास अशक्य असल्याचे म्हटले गेले होते. कॅन्सरमुक्त झाल्यानंतरही युवराजमध्ये खूप शारिरीक बदल झाले होते. पण त्यासर्वांवर मात करून कसून सराव आणि मैदानात प्रचंड घाम गाळून युवराजने क्रिकेटप्रतीची ध्येयासक्ती जपली. इतकेच नाही, तर युवराजने सामाजिक भान राखून कॅन्सरशी झुंज देणाऱया रुग्णांच्या मदतीसाठी देखील पुढाकार घेतला. युवराजने YouWeCan नावाचे आपले फाऊंडेशन देखील सुरू केले. नुकतेच कटकमधील आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश केल्यानंतर तिसऱया सामन्यासाठी कोलकात्याला रवाना होण्यापूर्वी युवीने कटकमधील कॅन्सरग्रस्तांची भेट घेतली. रुग्णलायतील रुग्णांशी बातचीत करून युवीने त्यांचा आत्मविश्वास वाढवला. मैदानातील आपला स्टार खेळाडू स्वत: भेट घ्यायला आल्याचे पाहून रुग्णांच्या चेहऱयावर एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळाला. कॅन्सरवर मात करून तुम्ही नव्याने आपल्या आयुष्याची सुरूवात करु शकता असा आत्मविश्वास युवराजने रुग्णांना दिला.