कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने पुढाकार घेतला असून लंडनमध्येही त्याचे हे अभियान सुरू असणार आहे. कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी युवराजने १४ जुलै रोजी कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, केव्हिन पीटरसन आणि सौरव गांगुली यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमात अनेक मातब्बर खेळाडूंच्या विविध वस्तूंचा लिलाव होणार आहे. सचिनने २००व्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी, २०११मध्ये जिंकलेल्या विश्वविजेतेपदाचे पदक आदी वस्तूंचा लिलाव या वेळी केला जाणार आहे. या लिलावाद्वारे जमा झालेली रक्कम कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे. कर्करोगाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी युवराजने ‘युवीकॅन’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठीही लिलावातील निधीचा विनियोग केला जाणार आहे. युवराजने स्वत: कर्करोगाचा सामना केला असून त्यामधून तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.