भारताचा स्टार गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या नात्यातील संदिग्धता अखेर संपुष्टात आली आहे. सध्या आयपीएल सामन्यांमध्ये व्यस्त असलेल्या झहीर खान याने सागरिकासोबत साखरपुडा झाल्याची माहिती सोशल मीडियावर जाहीर केली. झहीरने सागरिकासोबतचा एक फोटो ट्विट करून त्यात साखरपुडा झाल्याची माहिती दिली. फोटोत सागरिकाची साखरपुड्याची अंगठी देखील दिसते.
३८ वर्षीय झहीर खान सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्त्व करत आहे. आयपीएलमध्ये झहीरने ९५ सामने खेळले असून त्याच्या नावावर ९९ विकेट्स जमा आहेत. झहीरच्या शंभराव्या विकेटआधीच सागरिकाने त्याची विकेट काढली.

युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले होते. झहीर खान सागरिकाला डेट करत असल्याच्याही बातम्या पुढे आल्या. सहा महिन्यांपूर्वी दोघांची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे घनिष्ट मैत्रीत रुपांतर झाल्याचे सांगण्यात आले. सागरिकाने नंतर पुढे येऊन झहीरसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.

”मी माझ्या वैयक्तिक आयुष्याची माहिती याआधीच केव्हाच जाहीर केलेली नाही. मी माध्यमांसमोर देखील कोणतीही कबुली दिलेली नाही. तरीसुद्धा चर्चा केल्या गेल्या. मी माझ्या आयुष्यात सध्या खूप खूश आहे. वैयक्तिक आयुष्य हे चर्चेचे ठिकाण नसते.”, असे सागरिका म्हणाली होती. यात तिने झहीरसोबतच्या डेटचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले नव्हते. अखेर झहीरने ट्विट केलेल्या फोटोनंतर दोघांमधील नात्याचा उलगडा झाला आहे. लवकरच दोघं लग्नाची तारीखही जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.