अथेन्स येथे २००४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत राजवर्धनसिंह राठोड याने नेमबाजीत रौप्यपदक मिळवीत सनसनाटी कामगिरी केली. मात्र या खेळात करिर करता येते हे सिद्ध करीत अभिनव बिंद्रा याने देशात नेमबाजीचे युग निर्माण केले. २००८ मध्ये बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि ऐतिहासिक कामगिरी केली. भारतास ऑलिम्पिकमधील वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक होते.

बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीत तो चौथ्या क्रमांकावर होता. त्या वेळी सुवर्णपदकासाठी हेन्री हक्कीनन हा दावेदार होता. प्राथमिक व अंतिम फेरी या कालावधीत खेळाडूंना विश्रांती मिळाली होती. या कालावधीत त्याची रायफल तोडण्याचा प्रयत्न झाला होता. अभिनव हा अंतिम फेरी खेळण्यासाठी आला त्या वेळी त्याला हा प्रकार लक्षात आला. मात्र त्याने कोणतीही तक्रार केली नाही. जणुकाही आपल्यासाठी ही अग्निपरीक्षाच आहे असे मानून त्याने एकाग्रतेने अंतिम फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी केली. या फेरीत त्याच्या प्रत्येक नेमच्या वेळी दहापेक्षा जास्त गुण मिळत होते. संयम, चिकाटी व जिद्द याचा सुरेख मिलाफ दाखवीत त्याने सर्व खेळाडूंना मागे टाकून देशाचा तिरंगा फडकविला. भारतास १९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर भारतास मिळालेले हे पहिलेच ऑलिम्पिक सुवर्णपदक होते.

अभिनव याची या ऑलिम्पिकसाठी निवड झाली, त्या वेळी त्याच्यावर प्रसारमाध्यमांकडून भरपूर टीका झाली होती. २००० व २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची त्याला संधी मिळाली होती, मात्र दोन्ही वेळा त्याला अपयश आले होते. त्यामुळेच बीजिंग येथील ऑलिम्पिकच्या वेळी त्याला टीकेचे लक्ष्य केले होते. २००० च्या ऑलिम्पिकचे वेळी तो अवघा १८ वर्षांचा होता. अनेक अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत भाग घेत असताना त्याच्यावर दडपण आले होते. २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने प्राथमिक फेरीत ५९७ गुण नोंदवीत ऑलिम्पिक विक्रम केला होता. तथापि अंतिम फेरीत त्याला अपेक्षेइतके यश मिळाले नाही.

मेलबर्न येथे २००६ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. पाठोपाठ त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही त्याच यशाची पुनरावृत्ती केली. या दोन्ही अव्वल यशानंतर त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. साहजिकच त्याला दोहा येथील आशियाई क्रीडा स्पर्धेवर पाणी सोडावे लागले. प्रसारमाध्यमांनी त्याच्या या दुखापतीचाही आधार घेत अभिनवला ऑलिम्पिकमध्ये स्थान देऊ नये अशी टीका केली. मात्र अभिनव याने या टीकेपासून दूर राहण्यासाठी जर्मनीत दीड वर्षे प्रशिक्षण घेण्याचा मार्ग निवडला. फक्त नेमबाजीचे कौशल्य आणि त्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती यावरच लक्ष केंद्रित केले. याच सरावाचा फायदा त्याला ऑलिम्पिकमधील सोनेरी कामगिरीसाठी झाला.

अभिनव याला पतियाळा येथील घरातच त्याच्या पालकांनी नेमबाजीचे छोटे केंद्र तयार करून दिले होते. त्यामुळे त्याला नेमबाजीची आवड निर्माण झाली नाही तरच नवल. १९९८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची संधी त्याला मिळाली. त्या वेळी तो जेमतेम पंधरा वर्षांचा होता. या स्पर्धेत त्याला पदक मिळाले नाही तरी तेथून त्याच्या नेमबाजीच्या करिअरला दिशा मिळाली. २००१ मध्ये त्याने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहा सुवर्णपदकांची कमाई केली. आजपर्यंत त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये चार सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळाली आहेत. २००६ मध्ये झॉगरेब येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळाले.

बिंद्रा याला आतापर्यंत राजीव गांधी खेलरत्न, पद्मभूषण व अर्जुन आदी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्याला नेमबाजी या खेळानेच तेजोवलय दिले आहे. या खेळाचे ऋण फेडण्यासाठी तो उदयोन्मुख नेमबाजांच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गो स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मार्फत सातत्याने प्रयत्न करीत असतो. आगामी ऑलिम्पिकमध्ये तो पुन्हा बीजिंगमधील सोनेरी कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी उत्सुक आहे.

बिंद्राची पदकांची कामगिरी

  • ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा – बीजिंग येथे २००८ मध्ये दहा मीटर एअर रायफल-सुवर्ण
  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धा – झॉगरेब येथे २००६ मध्ये दहा मीटर एअर रायफल-सुवर्ण
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – मँचेस्टर येथे २००२ मध्ये दहा मीटर एअर रायफल (दुहेरी)-सुवर्ण
  • दहा मीटर एअर रायफल (एकेरी)-रौप्य
  • मेलबर्न येथे २००६ मध्ये दहा मीटर एअर रायफल (दुहेरी)-सुवर्ण
  • दहा मीटर एअर रायफल (एकेरी)-कांस्य
  • नवी दिल्ली येथे २०१० मध्ये दहा मीटर एअर रायफल (दुहेरी)-सुवर्ण
  • दहा मीटर एअर रायफल (एकेरी)-रौप्य
  • ग्लासगो येथे २०१४ मध्ये दहा मीटर एअर रायफल (दुहेरी)-सुवर्ण
  • आशियाई क्रीडा स्पर्धा – गुआंगझुओ येथे २०१० मध्ये दहा मीटर एअर रायफल (सांघिक)-रौप्य
  • इनचान येथे २०१४ मध्ये दहा मीटर एअर रायफल (सांघिक)-कांस्य
  • दहा मीटर एअर रायफल-वैयक्तिक विभाग-कांस्य