गोल्फपटू अदिती अशोकने प्रभावी कामगिरीसह अंतिम फेरी गाठली. बंगळुरूच्या १८वर्षीय अदितीने २०१३ आशियाई युवा अजिंक्यपद, २०१४ युवा ऑलिम्पिक आणि २०१४

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. ऑलिम्पिक गोल्फ स्पर्धेत ६० खेळाडूंचा सहभाग असतो. अदितीने १८ होलवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

 

संदीप कुमारला ३४वे स्थान

रिओ दी जानिरो : भारतीय धावपटूंची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. त्यांच्या संदीप कुमारला ५० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ३४वे स्थान मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास चार तास ७ मिनिटे ५५ सेकंद वेळ लागला. स्लोवाकियाच्या तोथ मातेजो ही शर्यत तीन तास ४० मिनिटे ५८ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या जेराड टॅलेंन्टने रौप्यपदक मिळवले. हे अंतर पार करण्यास त्याला तीन तास ४१ मिनिटे १६ सेकंद वेळ लागला. कॅनडाच्या इव्हान डुन्फीला कांस्यपदक मिळाले. त्याने ही शर्यत तीन तास ४१ मिनिटे ३८ सेकंद या वेळेत पूर्ण केली.

 

पहिल्याच फेरीत संदीप तोमरचे आव्हान संपुष्टात

रिओ दी जानिरो ; भारताच्या संदीप तोमरला कुस्तीच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. फ्रीस्टाइल विभागातील ५७ किलो गटात रशियाच्या व्हिक्टर लेवेदेवने त्याला ७-३ असे पराभूत केले. या पराभवासह संदीपचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

या लढतीमधील पहिल्या तीन मिनिटांमध्ये व्हिक्टरने डाव टाकून दोन गुण वसूल केले. संदीप कुस्ती करायची टाळाटाळ करतो, या कारणास्तव पंचांनी त्याला ताकीद देत व्हिक्टरला एक गुण बहाल केला.

तीन मिनिटांच्या दुसऱ्या फेरीत व्हिक्टरने दोन वेळा डाव टाकून प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. संदीपने या फेरीत तीन गुण वसूल केले,  मात्र तो व्हिक्टरची आघाडी मोडू शकला नाही.