बढती देण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही, प्रायोजकांचा अभाव असतानाही बॉक्सर मनोजकुमार याला आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकाची खात्री वाटत आहे.

मनोज या २८ वर्षीय खेळाडूने आशियाई स्तरावर अनेक पदकांची लयलूट केली आहे, तसेच त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. मनोज याच्याबरोबरच शिवा थापा (५६ किलो) व विकास कृष्णन (७५ किलो) हे खेळाडूही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी मनोज हा पदकाचा दावेदार मानला जात आहे.

मनोज हा ६४ किलो गटात प्रतिनिधित्व करीत आहे. तो म्हणाला, माझे पूर्वज मराठा सैन्यात होते व शिवाजीमहाराज यांच्या चरित्रापासून मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्यासारखे आत्मविश्वासाने लढण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीत असतो.

मनोज हा रेल्वे खात्यात नोकरी करीत असून २०१० मध्ये त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला बढती देण्याचे आश्वासन मिळाले होते, मात्र अद्यापही मला बढती मिळालेली नाही. ममता बॅनर्जी यांच्याकडे केंद्रीय रेल्वेमंत्रिपद असताना त्यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर आतापर्यंत सात रेल्वेमंत्री झाले आहेत, मात्र अद्याप माझा अर्ज खात्यात पडून आहे.

प्रायोजकांबाबत मनोज म्हणाला, मला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आर्थिक सहकार्य करण्याबाबत मी अनेक कंपन्यांकडे अर्ज पाठवले, मात्र एकाही कंपनीकडून मला उत्तर आलेले नाही. मात्र खेळास रामराम ठोकण्याचा मी कधीही विचार केलेला नाही. जी काही तुटपुंजी आहे, त्यामधून माझी बॉक्सिंग कारकीर्द मी घडवीत आहे. मी जरी हरयाणाचा असलो तरी क्रिकेट, कुस्ती किंवा बॉक्सिंगमधील खेळाडूंप्रमाणे मला अपेक्षेइतके आर्थिक सहकार्य लाभलेले नाही. कदाचित कोणापुढे हांजी हांजी करण्याची मला सवय नाही. त्याचाच हा परिणाम असेल. मनोज याला २०१४ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता, मात्र त्यासाठीदेखील त्याला झगडावे लागले होते.