क्रीडाज्योतीच्या कार्यक्रमाच्या वेळी काही आंदोलकांनी केलेल्या गोंधळाचे पर्यावसान दंगलीत झाल्यामुळे संयोजकांपुढे सुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीने आढावा घेण्याची वेळ आली आहे.

रिओच्या दक्षिणेला असलेल्या आंग्रादोस रीस या ठिकाणी क्रीडाज्योतीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला गेला. त्या वेळी सुरक्षा कर्मचारी व आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक उडाली. त्याचे पर्यावसान दंगलीत झाले. आंग्रादोस रीस येथे आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा उपयोग करावा लागला. पगारात तातडीने वाढ करावी व सार्वजनिक व्यवस्थेत सुधारणा करावी या मागणीसाठी तेथील अनेक कामगारांनी हे आंदोलन सुरू केले होते.

मेट्रो सेवेत नोकरीला असलेल्या कामगारांनी ९.८३ टक्क्यांनी पगार वाढवावा अन्यथा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्याचे सुरक्षा सचिव होजे मारिआनो बेल्ट्रेम यांनी पोलीस व्यवस्थेत कमालीची सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.