आर्थिक अडचणींना सामोरे जात येथील संयोजकांनी  रिओ ऑलिम्पिक  स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. आणखी चार वर्षांनी टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजकांपुढे आतापासूनच आर्थिक अडचणींचे डोंगर उभे राहिले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर येथील महापौर एडवर्ड पेस यांच्याकडून टोकिओच्या गव्हर्नर युरिको कोईको यांनी ऑलिम्पिक ध्वज स्वीकारला.

दक्षिण कोरियात २०१८ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर टोकिओ येथे २०२० मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा व २०२२ मध्ये बीजिंग येथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या तीनही स्पर्धा आशियाई खंडात होणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) थोडी उसंत मिळणार आहे. सोची येथे २०१४ मध्ये झालेली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा व त्यापाठोपाठ येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा आर्थिक समस्यांसह विविध कारणांमुळे गाजली. या दोन्ही स्पर्धाच्या संयोजनाबाबत आयओसीचे पदाधिकारी समाधानी नाहीत.

कोईको यांनी सांगितले, ‘ऑलिम्पिकसाठी बरेच स्टेडियम्स अगोदरपासूनच वापरात असलेली आहेत. फक्त त्यामध्ये काही ठिकाणी नूतनीकरण करण्याची आवश्यकता असून त्याचे कामही सुरू झाले आहे.’

जपानमध्ये बेसबॉल (सॉफ्टबॉल) खूप लोकप्रिय आहे. त्याचा फायदा जपानला पदक जिंकण्यासाठी होणार आहे. यंदा जपानने ४१ पदकांची कमाई केली. टोकिओ येथील स्पर्धेच्या संयोजनात कोईको यांच्याबरोबरच तामायो मारुकावा या आणखी एका महिला संघटकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान शिंझो अबे यांनी मारुकावा यांच्याकडे नुकतीच ऑलिम्पिकमंत्री म्हणून स्वतंत्र जबाबदारी सोपविली आहे.

नवीन खेळ :  टोकिओ ऑलिम्पिकमध्ये बेसबॉल (सॉफ्टबॉल), स्केटबोर्डिग, सर्फिग, कराटे व स्पोर्ट्स क्लाइम्बिंग या पाच क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ३३ क्रीडा प्रकारांमध्ये ११ हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे.

 ऑलिम्पिकबाबत काळजी

टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकबाबतही हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) पदाधिकारी काळजीत आहेत. कारण स्टेडियम्सच्या खर्चामध्ये तीनपट वाढ झाली आहे. नियोजित अंदाजापेक्षा किमान ५० टक्के वाढ अंदाजपत्रकात सुचविण्यात आली असली तरीही त्यापेक्षा जास्त खर्च होण्याची चिन्हे आहेत.

ऑलिम्पिक ध्वज खूप हलका असला तरी ही स्पर्धा आयोजित करणे सोपे नाही. विविध क्रीडा सुविधांसाठी येणारा वाढता खर्च, तसेच नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश याचेही आव्हान आमच्यापुढे आहे. आमच्या दृष्टीने या सर्व सुविधा म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारख्या असल्या तरीही या खर्चाचा भार आमच्याकडील सामान्य नागरिकांवर पडणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.

– युरिको कोईको,  टोकिओच्या गव्हर्नर