दुसऱ्या उत्तेजक चाचणीत निर्दोष

गोळाफेकपटू इंदरजित सिंगसह भारतीय क्रीडा प्रेमींना दिलासा देणारी बातमी बुधवारी धडकली. हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेदरम्यान घेतलेल्या इंदरजितच्या नमुन्यात उत्तेजकाचे अंश सापडले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे त्याच्या रिओ ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुस्तीपटू नरसिंग यादवचे प्रकरण ताजे असताना इंदरजितच्या ‘अ’ नमुन्यात उत्तेजक आढळल्यामुळे भारताच्या रिओ मोहिमेला जबर धक्का बसला होता. मात्र, बुधवारी उत्तेजकाचे अंश सापडले नसल्याची माहिती  सुत्रांनी दिल्यामुळे इंदरजितला थोडासा दिलासा मिळाला आहे. २२ जूनला घेतलेल्या उत्तेजक चाचणीत इंदरजित दोषी आढळला होता आणि त्यामुळे पुढील सात दिवसांत ‘ब’ नमुन्याच्या चाचणी करण्यात येणार असल्याने राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) इंदरजितला कळविले होते. त्यानुसार २९ जून रोजी त्याची चाचणी घेण्यात आली आणि त्यात तो निर्दोष आढळला आहे.

‘‘२९ जून रोजी घेण्यात आलेल्या नमुन्यात उत्तेजकाचे प्रमाण आढळले नाही. नाडाकडून अनेक खेळाडूंच्या नमुन्यांची तपासणी केली जाते आणि कोणते नमुने दोषमुक्त आहेत, याची ते माहिती देत नाही. केवळ दोषी आढळलेल्या नमुन्यांची माहिती ते देतात,’’ असे सुत्रांनी सांगितले.

 

शिवा थापाला पदकाची आशा

पीटीआय, नवी दिल्ली

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वयाच्या २२ व्या वर्षीच संधी मिळालेला शिवा थापा हा युवा बॉक्सर रिओ येथील स्पर्धेत पदक मिळविण्याबाबत आशावादी आहे. वाढलेल्या ताकदीच्या जोरावर हे यश मिळविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

शिवाने गत वर्षी दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून  ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता.

शिवा म्हणाला, ‘गेल्या चार वर्षांमध्ये माझ्या ताकदीत निश्चित वाढ झाली आहे. सब-ज्युनिअर गटांमध्ये मी भाग घेत होतो. तेव्हा मी विजेंदरसिंग व अखिलकुमार यांच्या लढती पाहिल्या आहेत. खरंतर २००८ मध्ये ऑलिम्पिकमधील सहभागाचे स्वप्न मी पाहिले होते. मात्र त्या वेळी मी लहान होतो. माझे ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न २०१२ मध्ये साकार झाले. ’’