महिलांच्या बॉक्सिंगचा लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला असला, तरी या खेळाडूंना प्रायोजकत्व व प्रसिद्धीबाबत दुजाभाव मिळत असल्याची तक्रार अनेक महिला खेळाडूंनी केली.

अमेरिकेच्या क्लारेसा शिल्ड्सने लंडन येथे मिडलवेट गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये अमेरिकेला पुरुष गटात एकही पदक मिळाले नव्हते. मात्र क्लारेसाने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल अमेरिकेत फारसे कौतुक केले गेले नाही. याबाबत क्लारेसा म्हणाली, ‘‘माझ्या सुवर्णपदकाबद्दल एकदा वृत्त प्रसिद्ध झाले, मात्र अपेक्षेइतके प्रायोजकत्व किंवा जाहिराती मला मिळाल्या नाहीत. त्यामुळे आपण बॉक्सिंगमध्ये करिअर सुरू केले आहे याचा मला पश्चात्ताप वाटू लागला. आम्हीदेखील सुवर्णपदक मिळविण्यासाठी कष्ट केलेले असतात. पुरुष खेळाडूंप्रमाणेच  समान वागणूक मिळण्याची गरज आहे.’’

जेनिफर चिएंग म्हणाली की, ‘‘मी जेव्हा बॉक्सिंगमध्येच कारकीर्द घडवत असल्याचे सांगते, त्या वेळी माझी अवहेलना केली जाते.’’

चिएंग हिला एक अपत्य आहे. तिला येथील पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. मात्र आपण महिलांच्या बॉक्सिंगचा विकास करण्यासाठीच भाग घेतला होता, असे ती सांगत असते. तिने आर्थिक विषयात पदव्युत्तर पदवी संपादनही केली आहे. मात्र तिने बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले आहे.

ऑस्ट्रेलियाची शैली व्ॉट्स ही महिलांनाही बॉक्सिंग करण्याचा हक्क असल्याचे सांगून सतत त्याकरिता पाठपुरावा करीत असते. ती म्हणाली, ‘‘आत्मसंरक्षण करण्याचा केवळ मुलांनाच हक्क आहे असा गैरसमज आहे. मुलींना आत्मसंरक्षणाची जास्तच गरज असते व त्यामुळेच मी मुलींमध्ये बॉक्सिंग खेळाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करीत असते.’’