दळणवळणासाठी पक्का रस्ता नाही.. शिक्षणासाठी आजही चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागते.. पाण्यासाठीही वणवण ही त्यांच्या नशिबीच.. अशा राजस्थानमधील खोकसर गावातून एक ऑलिम्पिकपटू भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी रिओत दाखल झाला आहे. चौकटीबाहेर पाहिलेल्या स्वप्नांना अथक प्रयत्नांची जोड देऊन धावपटू खेता रामने आपल्या गावच्या युवकांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.  रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत मॅरेथॉनमध्ये पदकाची कमाई करून गावाला खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम..बनवण्याचा निर्धार खेताने मनाशी पक्का केला आहे.

खोकसर या राजस्थानमधील लहानशा गावात खेळात कारकिर्द घडवणे, हा विचारही कोणाच्या मनात येत नाही. रोजच्या समस्यांना सामोरे जाण्यात तरुणांची अधिक ऊर्जा खर्चिली जाते. त्यामुळेच त्यांना समाजाने व परिस्थितीने आखलेल्या चौकटीबाहेर विचार करण्यासाठीही उसंत मिळत नाही. अशा या दगदगीच्या आणि संघर्षमय वाटचालीतून खेता रामने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले. शेती करा.. कामापुरते शिका इतकेच स्वप्न पाल्य आपल्या मुलांकडून पाहतात. खेताने ही चौकट मोडली. शालेय जीवनात सर्व मुले खेळात सहभाग घेतात म्हणून खेताही घेत होता, मात्र उपजत गुणांमुळे खेळाप्रती त्याची ओढ अधिकच वाढली. आजही तो रिओत खेळणार आहे, याचा गंध त्याच्या घरच्यांना नाही. मुळात ऑलिम्पिक म्हणजे काय हेही त्यांना माहित नाही, असे खेता सांगतो. पुणे आर्मी स्पोर्ट्स इंस्टिटय़ूटमधील खेताने मुंबई मॅरेथॉनमध्ये २ तास १७ मिनिटे व २३ सेंकदाची वेळ नोंदवून ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले. ‘‘ मी पहिल्यांदा खेळात पदक जिंकले तेव्हा माझ्या पगारात किंचितशी वाढ झाली. तेव्हा घरच्यांना माझ्या धावण्याचे महत्त्व पटले. पण, आज तुम्ही मला विचारताय अमुक एक स्पध्रेत तू चांगली कामगिरी केलीस, तु पदक जिंकलेस, परंतु माझ्या घरच्यांना याबाबत काहीच माहित नाही. त्यांना ऑलिम्पिक आणि स्थानिक स्पर्धा यातील फरकच माहित नाही. मला खेळाप्रती रुची आहे, म्हणून त्यांनी मला पाठींबा दिला.’’

खेताचे आई-वडील आणि पत्नी अशिक्षित आहे. त्याने शिक्षणाचे धडे गिरवलेल्या शाळेत गेल्या ४४ वर्षांपासून सुधारणा झालेली नाही. शाळेत आठवी पर्यंतच वर्ग असल्यामुळे  तरुणांची झेपही तेवढीच मर्यादित राहिली. खेताने मात्र जीवनाशी झगडत इथवर मजल मारली. २०१४च्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पध्रेत खेताने ५००० मीटर स्पध्रेत १३ मिनिटे ४९.१७ सेकंदाची वेळ नोंदवून सात वर्षांपूर्वीचा सुरेंदर सिंग (१३:५१.६४) यांचा विक्रम मोडला. त्यानंतर तो प्रसिद्धी झोतात आला. मात्र, त्याला या प्रकारात समाधानकारक कामगिरी करता येत नव्हती आणि त्यामुळे प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार त्याने मॅरेथॉनपटू होण्याचा निर्णय घेतला. खेता म्हणाला, ‘‘सुरुवातीला मी ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड प्रकारात सहभाग घेतला, परंतु सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नसल्यामुळे मॅरेथॉनकडे वळलो. काही वर्ष मी अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर पुर्ण मॅरेथॉनकडे वळलो आणि आता ऑलिम्पिक हेच लक्ष्य आहे.’’

खेताने २०११ मध्ये बंगळुरु येथे झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत १० हजार मीटर शर्यतीत पहिले सुवर्णपदक पटकावले. त्याच वर्षी आशियाई स्पध्रेतही सहभाग घेतला. त्यानंतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेवून खेताने आपल्या अनुभवात भर टाकली. ‘मॅरेथॉनकडे वळल्यानंतर ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे या गोष्टीचा अधिक आनंद आहे. ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडण्याचे पहिले ध्येय आहे. त्यासाठी अथक मेहनत घेतोय,’ असे खेता म्हणाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या खेळाडूच्या गगनभरारीने खोकसर गावातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.  गावात आल्यावर युवक घरी घेऊन खेळात कारकिर्द घडविण्याविषयी बरीच विचारपूस करतात, असे खेता अभिमानाने सांगतो. आज खेता खोकसर गावातील तरुणांचा आदर्श ‘राम’ बनला आहे.

 

खेताची कामगिरी

  • राष्ट्रीय स्पध्रेत १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक (२०११)
  • वसई-विरार महापौर मॅरेथॉन (२:२२:३२)
  • फेडरेशनच चषक राष्ट्रीय वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेत ५००० किमी शर्यतीत विजय (२०१४)

 

स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com