टेनिसमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी जिद्दीच्या जोडीला भक्कम तंदुरुस्तीची आवश्यकता असते. राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच यांच्यासह अनेक जगज्जेते खेळाडूही तंदुरुस्तीच्या समस्येने अनेक वेळा ग्रासले आहेत. मात्र टेनिसमध्ये भारताचा एकांडी शिलेदार म्हणून बिरुद लाभलेला लिअँडर पेस हा तंदुरुस्तीचा महागुरूच ओळखला जातो. सलग सात ऑलिम्पिक स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे ही काही सोपी गोष्ट नाही. तथापि पेसच्या नावातच शारीरिक चिकाटी दडली आहे. १९९६ साली अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविलेला पेस अजूनही खेळतच आहे.

ऑलिम्पिकमध्ये अनेक वेळा अव्वल दर्जाचे टेनिसपटू भाग घेत नाहीत. मात्र पेसने १९९६ च्या ऑलिम्पिकमध्ये निर्धाराने भाग घेतला. त्याने या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडूंवर मात करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्या वेळचा जगज्जेता खेळाडू आंद्रे अगासी याच्याशी त्याला दोन हात करावे लागले. पेसने चिवट झुंज दिल्यानंतर पराभव स्वीकारला. सामना संपल्यानंतर अगासीने पेसचे कौतुक करताना सांगितले, ‘तुझ्यासारखा जिगरबाज खेळाडू पाहिलेला नाही.’ त्याचे हे वाक्य पेसच्या खेळाविषयी खूप काही सांगून जाते.

पेसने उपांत्य फेरीतील पराभवाचे कोणतेही दडपण न घेता कांस्यपदकाची लढत दिली. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने ब्राझीलच्या फर्नान्डो मेलिगेनीवर मात करीत ऐतिहासिक पदक मिळविले. भारताला टेनिसमधील मिळालेले हे एकमेव ऑलिम्पिक पदक आहे. हेलसिंकी येथे १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर भारताला ऑलिम्पिकमधील वैयक्तिक क्रीडाप्रकारात मिळालेले हे पहिलेच पदक होते.

जाज्वल्य देशाभिमान व जबरदस्त महत्त्वाकांक्षा लाभलेल्या पेसने कारकीर्दीत आतापर्यंत पुरुष दुहेरीत आठ ग्रँड स्लॅम विजेती पदे तर मिश्र दुहेरीत दहा ग्रँड स्लॅम अजिंक्यपदांची कमाई केली आहे. ग्रँड स्लॅममधील दुहेरीत विजेतेपद मिळविणारा सर्वात प्रौढ खेळाडू म्हणूनही त्याने विक्रम केला आहे. डेव्हिस चषक स्पर्धेतही त्याने अनेक वेळा भारतास अनपेक्षित विजय मिळवून दिले आहेत. राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन आदी अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

पेसने १९९१ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हापासून त्याला अनेक वेळा विविध कारणांस्तव संघर्ष करावा लागला आहे. दुहेरीतील त्याचा नेहमीचा सहकारी महेश भूपतीबरोबर झालेले मतभेद, ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत त्याच्या साथीत खेळण्याबाबत अन्य खेळाडूंनी दिलेला नकार, वैयक्तिक जीवनात संसारिक आघाडीवरील समस्या आदी अनेक अडथळ्यांना त्याला तोंड द्यावे लागले आहे. अनेक वेळा त्याच्यापेक्षा वयाने व अनुभवाने कमी असलेल्या भारतीय खेळाडूंनी पेसवर कडाडून टीकाही केली आहे. तो असेल तर आपण खेळणार नाही अशी भूमिकाही अनेक खेळाडूंनी घेतली आहे. असे असूनही हे अडथळे त्याच्या यशाच्या मार्गात त्रासदायक ठरलेले नाहीत. सुदैवाने अनेक संघर्षांमध्ये अखिल भारतीय टेनिस महासंघाने पेस याच्या नावाला अधिक प्राधान्य दिले आहे. कितीही संकटे आली तरी त्याला हसत व आत्मविश्वासाने सामोरे जात त्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.

मैदानावर खेळताना परतीचे खणखणीत फटके कसे मारायचे, व्हॉलीजचा उपयोग कसा करायचा, नेटजवळून प्लेसिंग करताना कशी शैली ठेवायची. प्रतिस्पर्धी कितीही मोठा असला तरी संयम कसा ठेवायचा याबाबत पेस हा नेहमीच अव्वल दर्जाचा खेळाडू ठरला आहे. यंदाही त्याला ऑलिम्पिकसाठी संघात स्थान मिळविताना संघर्ष करावा लागला आहे. तो यंदा रोहन बोपण्णाच्या साथीत दुहेरीत खेळणार आहे. या जोडीने अलीकडे डेव्हिस चषक लढतीत कोरियाविरुद्ध दुहेरीचा सामना जिंकून दिला होता. कारकीर्दीतील पेसची ही अखेरची ऑलिम्पिक असणार आहे. कारकीर्दीची सांगता ऑलिम्पिक पदकानेच करण्यासाठी तो उत्सुक झाला आहे.

 

मिलिंद ढमढेरे
milind.dhamdhere@expressindia.com