रिओ पॅरालिम्पिकमधील भारताच्या निराशाजनक कामगिरीला दूर करत पॅरालिम्पिकपटूंनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. उंच उडी प्रकारात मरियप्पन थंगवेलू याने सुवर्ण तर वरूण भाटीनेही याच प्रकारात कांस्य पदक पटकावले. भालाफेक प्रकारात संदीपचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तो चौथ्या स्थानी राहिला. पॅरालिम्पिकमध्ये भारताने तब्बल १२ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले.
थंगवेलूने १.८९ मीटर उडी मारत सुवर्ण तर भाटीने १. ८६ मीटर उडी मारत कांस्यपदक पटकावले. अमेरिकेच्या सॅम ग्रेवीनेही १.८६ मीटर उडी मारून रौप्य पदक पटकावले. पॅरालिम्पकमध्ये भारताला १२ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळाले. यापूर्वी जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये हेजवर्ग पॅरालिम्पिकमध्ये तर भालाफेकपटू देव झाजरिया याने २००४ च्या अथेन्स सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. थंगवेलू हा तिसरा भारतीय सुवर्णपदक विजेता ठरला आहे.
भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत १० पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये दोन शरणार्थींसह ४ हजार ३४४ खेळाडू सहभागी झाले आहेत. जगातील १५४ देशांमध्ये या खेळांचे थेट प्रसारण केले जात आहे. पॅरालिम्पिकची सुरूवात १९४८ मध्ये झाली होती. या खेळात सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून त्रिशा जोर्नची ओळख आहे. तिने एकूण ५५ पदके पटकावली असून त्यात ४१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धा आयोजनासाठी ब्राझीलला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने आपातकालीन कर्ज काढून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष फिलीप क्रॉवेन यांनी स्पर्धा आयोजनाला संकाटाचा सामना करावा लागत असल्याचे मान्य केले आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या मुख्य स्पर्धेत भारतीय पथकाला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे १७ खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय खेळाडूला ७५ लाखांचे रोख पारितोषिक, रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ३० लाखांचे रोख पारितोषिक दिले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, रिओमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त ७ सप्टेंबरला इंटरनेट महाजालातील सर्वात लोकप्रीय सर्च इंजिन ‘गुगल’ने एक खास डुडल देखील तयार केले होते. या डुडलमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेतील विविध खेळांची ओळख करून देण्यात आली. गुगलच्या इंग्रजी अद्याक्षरातील दुसऱया ‘ओ’ या अद्याक्षरात पॅरालिम्पिक स्पर्धेतील विविध खेळांचे स्लाईड शो तयार करण्यात आला होते.