कारस्थानासंदर्भात सबळ पुरावा नसल्याचा क्रीडा लवादाचा दावा

कुस्तीगीर नरसिंग यादवने जाणीवपूर्वक उत्तेजक गोळय़ा घेतल्या होत्या. आपल्याविरुद्ध कारस्थान केल्याबाबत त्याने कोणताही सबळ पुरावा दिला नाही. त्यामुळेच त्याच्यावर उत्तेजकप्रकरणी चार वर्षांकरिता बंदी घालण्यात आली, असे क्रीडा लवाद न्यायालयाने म्हटले आहे.

‘‘नरसिंगने केलेला गुन्हा हा केवळ एकदाच घडलेला प्रकार नाही. त्याच्या पहिल्याच उत्तेजक चाचणीद्वारे त्याच्या शरीरातील उत्तेजकाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले. कोणत्याही पेयाद्वारे हे उत्तेजक न जाता गोळय़ांद्वारेच हे उत्तेजक घेतले गेले असावे असे आढळले आहे. पुन्हा दुसऱ्या चाचणीच्या वेळीही नरसिंगच्या शरीरात उत्तेजकाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले,’’ असे क्रीडा लवादाच्या अस्थायी समितीने म्हटले आहे.

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीवर (वाडा) काम करणारे कॅनडातील तज्ज्ञ प्रा. ख्रिस्तिन आयोट्टी यांनी नरसिंगच्या उत्तेजक चाचणीच्या विविध अहवालांचा सखोल अभ्यास केला. त्याचाही आधार क्रीडा लवादाने घेतला.

‘‘नरसिंगने आपल्याविरुद्ध कारस्थान करण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु या दाव्याला पुष्टी देण्यासाठी तो कोणताही सबळ पुरावा देऊ शकला नाही. आहारातून उत्तेजक दिल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र जर आहारातून उत्तेजक गेले असते तर त्याचा परिणाम खूप मोठा झाला नसता. त्याने नियमित गोळय़ा घेतल्या असाव्यात,’’ असे क्रीडा लवादाने म्हटले आहे.

नरसिंगच्या आहारात उत्तेजक पदार्थ मिसळणाऱ्या जितेशला ज्या तीन जणांनी पाहिले, त्यांची राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) चौकशी केली होती. त्या आधारे ‘नाडा’ संस्थेने नरसिंगवरील आरोप मागे घेत त्याला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली होती. मात्र क्रीडा लवादाने ‘नाडा’च्या अहवालापेक्षाही आयोट्टी यांच्यासह तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाला प्राधान्य दिले. तसेच नरसिंगचे कायदेशीर सल्लागार विदुषपत सिंघानिया यांनीही मांडलेली बाजू सीएएसने ग्राहय़ मानली नाही व तज्ज्ञांच्याच मतावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.