भारतीय मल्ल नरसिंग यादव याच्यावर क्रीडा लवादाने चार वर्षांची बंदी घातल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

‘‘राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयाला जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने दिलेले आव्हान संशयास्पद आहे, असे डब्लूएफआयचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण यांना वाटते. तसेच नरसिंगच्या लढतीच्या दोन तासांपूर्वी क्रीडा लवादाने घेतलेल्या सुनावणीवरही शरण यांचा आक्षेप आहे,’’ असे डब्लूएफआयने आपल्या निवेदनात सांगितले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘‘नरसिंगला त्याची बाजू मांडण्यासाठी वकिलाला पाचारण करण्यासाठी किंवा बदली खेळाडू पाठवण्यासाठीही क्रीडा लवादाने महासंघाला वेळ दिला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी.’’