‘नाडा’ची शिस्तपालन समिती शनिवारी किंवा सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता

भारताचा मल्ल नरसिंग यादवबाबतचा राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीचा निर्णय गुरुवारी येणे अपेक्षित होते. पण ‘नाडा’च्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यावर शिस्तपालन समितीकडून निकाल लांबणीवर ढकलला गेला आहे. हा निर्णय आता शनिवारी किंवा सोमवारी होण्याची शक्यता आहे.

बुधवारी नरसिंगच्या वकिलांनी ६०० पानांचे प्रतिक्षापत्र सादर करत आपली बाजू मांडली होती. ऑलिम्पिक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे हा निर्णय गुरुवारी होईल, असे वाटले होते. पण शिस्तपालन समितीने या निकालासाठी काही दिवसांचा अवधी मागितला आहे.

‘आज दोन्ही पक्षांची बाजू शिस्तपालन समितीने समजून घेतली. या प्रकरणाचा निकाल शनिवारी किंवा सोमवारी होऊ शकतो,’ असे ‘नाडा’चे वकिल गौरांग कांथ यांनी सांगितले.

गौरांग यांनी पुढे सांगितले की, ‘ आपण उत्तेजकाचे सेवन केलेले नाही, हे नरसिंग सांगत असला तरी ते त्याला सिद्ध करता आलेले नाही. आपल्याविरुद्ध कट कारस्थान रचल्याचे नरसिंग सांगत असला तरी त्याबाबतचे सक्षम पुरावे त्याच्याकडे नाहीत. त्याने जे पुरावे सादर केले आहेत ते समाधानकारक नसल्याने तो दयेस पात्र नाही. त्यामुळे याप्रकरणी त्याला शिक्षा का करण्यात येऊ नये, अशी बाजू आम्ही मांडली आहे.’

या प्रकरणात मला गोवण्यात आले असून हा माझ्याविरुद्ध कट रचल्याचे नरसिंगने यापूर्वी सांगितले होते. याप्रकरणी त्याने पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे. ज्या दोन मल्लांवर नरसिंगच्या आहारामध्ये उत्तेजक मिसळल्याचा संशय घेतला जात आहे, त्यांच्याबाबत कोणताच तपास होताना दिसत नाही.

‘जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या कलम १०.४ नुसार नरसिंगला क्षमा करावी, अशी बाजू त्याच्या वकिलांनी मांडली होती. पण नरसिंगला कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नसल्याने तो क्षमेसाठी अपात्र आहे, अशी बाजू मांडली आहे,’ असे वकिलांना सांगितले.

नरसिंगने काळजी का घेतली नाही?

नरसिंग हा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. भारताच्या अन्य ११८ खेळाडूंनी जशी स्वत:च्या आहाराची काळजी घेतली तशी नरसिंगला का घेता आली नाही, असा प्रश्न ‘नाडा’च्यावतीने यावेळी विचारण्यात आला. याप्रकरणी नरसिंगचा निष्काळजीपणा भोवला, अशी बाजू ‘नाडा’च्या वकिलांनी मांडली.

नरसिंग राणाऐवजी खेळू शकतो- आयओए

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने नरसिंग यादवला निर्दोष ठरवल्यास ऑलिम्पिकमध्ये प्रवीण राणाऐवजी त्याला खेळण्यास आम्ही आक्षेप घेणार नाही अशी भूमिका भारतीय ऑलिम्पिक संघटनेने घेतली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नरसिंग यादव उत्तेजकांच्या ‘अ’ आणि ‘ब’ चाचणीत दोषी आढळला. यादरम्यान भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिकमध्ये ७४ किलो वजनी गटातून खेळण्यासाठी नरसिंगऐवजी प्रवीण राणाच्या नावाची शिफारस केली.

आपल्या आहारात उत्तेजक मिसळल्याचा आरोप नरसिंगने केला. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेसमोर नरसिंगची सुनावणी सुरू आहे. नरसिंगने खाण्यापिण्यात उत्तेजक मिसळल्याची भूमिका मांडली मात्र सबळ पुरावे तो सादर करू शकला नाही. नरसिंगला नाडाने मुक्त केल्यास त्याला ऑलिम्पिकला जाण्याची संधी मिळू शकते अशी आयओएने घेतली आहे. ‘आयओए पोस्ट ऑफिसप्रमाणे आहे. आम्ही समन्वयक आहोत. भारतीय कुस्ती महासंघाच्या इच्छेनुसार नरसिंगऐवजी प्रवीणची निवड जागतिक कुस्ती संघाने मान्य केली. नाडाने नरसिंगच्या बाजूने निर्णय दिल्यास, भारतीय कुस्ती महासंघानेही नरसिंगलाच पाठवायचा निर्णय घेतला आणि जागतिक संघटनेने त्याला मान्यता दिल्यास आम्ही आक्षेप घेणार नाही’, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.

काय आहे वाडाचे १०.४ कलम?

जर कोणत्या खेळाडूने किंवा व्यक्तीने वैयक्तिकरीत्या याचिका दाखल केली असेल आणि त्याला आपली कोणती चुक नसल्याचे वाटत असेल किंवा निष्काळजीपणा झाल्याचे वाटत असेल तर त्याला अपात्र ठरवले जात नाही. पण या गोष्टी अपवादात्मक असतात. खेळाडूला किंवा व्यक्तीला आपल्याबद्दल कट रचला असे वाटत असेल किंवा आपली काहीच चूक नसल्याचे वाटत असेल तर ती गोष्ट सिद्ध करावी लागते आणि त्याबाबतचे समाधानकारक पुरावे सादर करावे लागतात.

‘नाडा’च्या शिस्तपालन समितीपुढे मी माझी बाजू मांडली आहे. जे काही खरे होते ते मी त्यांना सांगितले. आता मी निर्णयाची वाट पाहतो आहे. मला अशी आशा आहे की, ‘नाडा’ची शिस्तपालन समिती योग्य तोच निर्णय घेईल.

– नरसिंग यादव, भारताचा मल्ल

नरसिंगची बाजू मी शिस्तपालन समितीपुढे मांडली. आमचा ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीवर पूर्णपणे विश्वास आहे. या शिस्तपालन समितीने आमची बाजू ऐकून घेतली आणि काही बाबतींमध्ये मदतही केली. त्यामुळे हा निकाल नरसिंगच्या बाजूने लागावा, अशी मला आशा आहे.

– विदुषपत सिंघानिया, नरसिंगचे वकिल