मी उत्तेजक सेवन चाचणीमध्ये दोषी असल्याचे वृत्त जगभरात प्रसिद्ध झाले आहे. माझी अब्रुनुकसानी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. यामधून त्यांना नेमके काय मिळणार, हे मी सांगू शकत नाही. त्यांनी माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. माझा कोणी अशा पद्धतीने सूड घेईल, असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे, असे स्पष्ट मत भारताचा मल्ल नरसिंग यादवने व्यक्त केले.

तुझ्याविरुद्ध कोण कटकारस्थान रचत आहे, असे विचारल्यावर नरसिंग म्हणाला की, ‘यापूर्वी जे काही घडले ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. माझी बदनामी करून ऑलिम्पिक स्पर्धेपासून वंचित ठेवून ज्यांना फायदा होईल त्यांनी हे दुष्कृत्य केले आहे. त्यांच्याविषयी मी अधिक काही बोलू इच्छित नाही. पण हे सर्व करून त्यांना काय साध्य करायचे आहे.’

नरसिंगचा सहकारी संदीप यादवही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. याबाबत विचारले असता नरसिंग म्हणाला की, ‘मी ऑलिम्पिकला जाणार आहे, पण संदीप ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे तो हे उत्तेजक द्रव्य घेण्याचा संबंधच येत नाही. आम्हा दोघांविरोधात कुणी कट रचून या प्रकरणात गोवले आहे.’

ऑलिम्पिकच्या तयारीपूर्वी नरसिंग स्पॅनिश अजिंक्यपद स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. पण त्यावेळी असे काहीच आढळले नव्हते, असे नरसिंग सांगतो. याबाबत तो म्हणाला की, ‘ स्पेनमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी मी गेलो होतो,त्यावेळी उत्तेजक चाचणीमध्ये अशी कोणतीही बाब निदर्शनास आली नव्हती. त्यानंतर १५ जुलैला मी पुन्हा सराव शिबिरामध्ये परतलो. त्यानंतरच हे कारस्थान करण्यात आले आहे. माझ्या पूरक आहारामध्ये उत्तेजक मिसळण्यात आले असून त्याचाच फटका बसला आहे.’

यापुढे तू काय करणार आहेस, असे विचारल्यावर नरसिंग म्हणाला की, ‘ शिस्तपालन समितीपुढे मला माझी बाजू मांडावीच लागणार आहे. त्यासाठी वकिलांशी मी चर्चा करत आहे. ज्याने खरेच असे काही केले आहे, तो हे कशातून झाले ते सांगू शकतो. पण मला याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे बाजू मांडणे माझ्यासाठी कठीण आहे, असा मला विश्वास आहे.’

सन्मान हा मागून मिळत नसतो तर तो कमवावा लागतो. गेली दहा वर्षे मी देशासाठी खेळतो आहे. देशवासियांचा पाठिंबा असल्यामुळे ही लढाईदेखील  मी जिंकेन, असा मला विश्वास आहे.

 – नरसिंग यादव