विक्रमी भालाफेक करूनही रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत खेळण्याची संधी मिळाली नसली तरी नीरज चोप्रा खचलेला नाही. २०२० साली टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत पदक पटकावण्याचा निर्धार नीरजने व्यक्त केला आहे. ‘रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याने निराश झालो आहे, परंतु महासंघ मला थेट प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवेश मिळाला तर आनंदच होईल, परंतु तसे न झाल्यास आणखी परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे आणि २०२०च्या ऑलिम्पिक स्पध्रेत देशाला पदक मिळवून देईन,’ असे नीरज म्हणाला.

१८ वर्षीय नीरजने पोलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या विश्व अजिंक्यपद (२० वर्षांखालील) स्पध्रेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८६.४८ मीटर लांब भाला फेकून कनिष्ठ गटाचा विश्वविक्रम आणि वरिष्ठ गटाचा राष्ट्रीय विक्रम मोडला. मात्र, रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्याचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे त्याची ऑलिम्पिकवारी हुकली.

याबाबत नीरज म्हणाला म्हणाला, ‘एप्रिलमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे माझ्या ऑलिम्पिक सरावावर परिणाम झाला. पोलंडमध्ये सुवर्णपदक पटकावण्याच्या निर्धारानेच दाखल झालो होतो आणि त्यावर विश्वविक्रमाची मोहोर उमटवल्याचा अधिक आनंद आहे. या पदकासाठी अथक मेहनत घेतली होती. आत्मविश्वासही द्विगुणित होता, परंतु विश्वविक्रमाची नोंद करेन असे वाटले नव्हते.’

क्रीडामंत्र्यांकडून सत्कार

क्रीडामंत्री विजय गोयल यांनी  बुधवारी नीरजचा सत्कार केला. ते म्हणाले, ‘‘नीरजचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याने ८६.४८ मीटर भालाफेक करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. तसेच त्याने लंडन ऑलिम्पिकमधील ८४ मीटरचा विक्रमही मोडला. त्याला रिओमध्ये खेळता येणार नसल्याचे दु:ख आहे. मात्र, २०२० साली तो भारताला पदक मिळवून देईल, असा विश्वास आहे.’’