रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेली धावपटू कविता राऊतला जाणवणारा ताप साधाच असून तिच्या रक्त व लघवीच्या नमुन्यात ‘झिका’ चे कोणतेही लक्षण आढळले नसल्याचा अहवाल येथील जिल्हा रूग्णालयास प्राप्त झाला आहे.

रिओ ऑलिम्पिकहून भारतात परत आलेल्या व तापाची लक्षणे दिसणाऱ्या खेळाडुंची ब्राझीलमधील भारतीय दुतावासाच्या निर्देशानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार कविता राऊतची सोमवारी सायंकाळी येथील जिल्हा रूग्णालयात तपासणी करण्यात आली. रविवारी भारतात परत आल्यापासून कविता राऊतला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. ब्राझीलमध्ये ‘झिका’ या आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. तिच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून नमुन्यांमध्ये झिकाचे कोणतेही लक्षण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक गजानन होले यांनी दिली. या अहवालामुळे कवितासह क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.