‘किन लोगो के लिए सेना के जवान जान की बाजी लगा रहे हैं, और किन लोगो के गर्व के लिए खिलाडी दिन रात पसीना बहा रहे है.भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल योगेश्वर दत्तचे हे ट्वीट देशाबद्दलचे आपले परखड मत व्यक्त करणारे आहे.

देशाविषयी मत व्यक्त करताना योगेश्वर कधीच थकत नाही. नेहमीच त्याने सर्व गोष्टींपेक्षा देशालाच जास्त प्राधान्य दिले आहे. २००६ सालची गोष्ट. दोहा येथे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी योगेश्वर सराव करण्यात मग्न होता. या दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. सरावाला स्वल्पविराम मिळाला. पण तरीही योगेश्वरने स्पर्धेला जायचे मनाशी पक्के केले होते. त्याने दुखापतीतून सावरण्यासाठी जेवढी मेहनत घेतली त्यापेक्षा जास्त सरावावर तो मेहनत घेऊ लागला. स्पर्धा ऐन तोंडावर आली होती. काहीच दिवस बाकी होते. आणि योगेश्वरला फार मोठा धक्का बसला. त्याच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्य़ाने तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. कारण वडिलांनी त्याला कुस्तीसाठी प्रेरित करत पाठिंबा दिला होता. वडिलांच्या निधनाने योगेश्वर खचला होता. दोन दिवसांमध्ये स्पर्धेला निघायचे होते. योगेश्वरचा पाय काही घरातून निघत नव्हता. हे दु:ख त्याला पेलवले नव्हते. आपण ही स्पर्धा खेळू शकत नाही, असे कळवायला योगेश्वर जाणारच होता. तेवढय़ात योगेश्वरची आई त्याला म्हणाली, ‘तू फक्त आमचाच मुलगा नाहीस, तर देशाचा आहेस.’ हेच वाक्य योगेश्वरने आपल्या मनात कोरले. आईच्या या बोलण्याने त्याला अफाट प्रेरणा मिळाली आणि तेव्हाच स्पर्धेमध्ये खेळायचा निर्णय योगेश्वरने घेतला. त्यावेळी योगेश्वर काही नावारूपाला आलेला ‘दादा’ मल्ल नक्कीच नव्हता. पण मनाशी खूणगाठ बांधत तो या स्पर्धेत उतरला आणि कांस्यपदक पटकावले. त्याने हे पदक अर्थातच वडिलांना समर्पित केले. अशा बऱ्याच घटना योगेश्वरच्या बाबतीत पाहायला मिळतील. त्याच्या आजीचे निधन, आईच्या हृदयात असलेले ‘ब्लॉक्स’ याची सुतरामही कल्पना घरच्यांनी योगेश्वरला दिली नाही.

सोनिपत जिल्ह्य़ातील गोहना हे योगेश्वरचे गाव. योगेश्वर लहान असताना त्यांच्या गावात बलराज पेहलवान होता. कुस्तीचे आखाडे त्याने गाजवले होते. त्यालाच योगेश्वरने प्रेरणास्थान मानत आठव्या वर्षी कुस्तीमध्ये पदार्पण केले. आखाडय़ांमध्ये घाम गाळायला सुरुवात केल्यावर सुरुवातीला त्याला वजन वाढवायचे धडे दिले गेले. कारण त्याचे वजन हे एका मल्लासाठी नक्कीच योग्य नव्हते. वजन वाढवताना त्याने मांसाहार कधीच केला नाही. एखाद्या जीवाला मारून खाणे योग्य नाही, असे म्हणत आजही योगेश्वर फक्त शाकाहारावरच अवलंबून आहे. वजन वाढवल्यावर त्याने तंत्रावर अधिक भर दिला. आताच्या घडीलाही सर्वात जास्त व्यायाम करणारा मल्ल म्हणून योगेश्वरचे नाव घेतले जाते.

योगेश्वरची काही वर्षांपूर्वीची छबी फार वेगळी होती. फारच लाजरा-बुजरा असा तो होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र त्याच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला आणि तो स्पष्टपणे आपले विचार मांडायला लागला. अगदी आपला सख्खा मित्र असलेल्या सुशील कुमारला सुनवायलाही त्याने मागे पुढे पाहिले नाही. सुशीलला काही करून ऑलिम्पिकला जायचे होते. पण ऑलिम्पिक प्रवेशिका नरसिंग यादवने मिळवली होती. त्यामुळे सुशीलने नरसिंगबरोबर चाचणी घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी योगेश्वरने सुशीलवर कडाडून टीका केली होती.

२००३ साली योगेश्वर पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. या स्पर्धेत त्याने २००५ आणि २००७ सालीही पदके मिळवली. २०१० आणि २०१२ साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले. २०१२ साली लंडनमधल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले. पण हे पदक पटकावल्यावरच त्याने निर्धार केला तो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा. २०१२ साली पदक जिंकल्यावर भारतात आल्यावर त्याने या सुवर्णपदकाची तयारीही सुरू केली. आतापर्यंत भारताने कुस्तीमध्ये एकही सुवर्णपदक पटकावलेले नाही. त्यामुळे या सुवर्णक्रांतीचा शिलेदार होण्यासाठी योगेश्वर सज्ज झाला आहे.

Untitled-1

 

– प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com