पुढील तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आणि खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करण्याच्या दृष्टीने एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी जाहीर केला. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२० साली टोकियोमध्ये पुढील ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने क्रीडा सुविधा, सराव, निवड प्रक्रिया आणि इतर निगडीत गोष्टींबाबतचे धोरण या कार्यदलाकडून आखण्यात येणार आहे. या कार्यदलात देशातील क्रीडा तज्ज्ञांसोबत विदेशातील तज्ज्ञांचाही समावेश असणार आहे. येत्या काही दिवसात हे कार्यदल स्थापन करण्यात येईल, असेही मोदी यांनी जाहीर केले आहे. २०२०, २०२४ आणि २०२८ साली होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करावे लागेल, याचा आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या कार्यदलावर असणार आहे.
नुकतेच ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथे पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठविले होते. ११८ खेळाडूंचे पथक यावेळी भारताने रिओला पाठविले होते. त्यापैकी महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने रौप्य, तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कांस्य पदकाची कमाई करून दिली.