भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिला रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाचा सिंधूने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तिसऱया व निर्णायक गेममध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक मारिनने पटकावले. तरीसुद्धा पी.व्ही.सिंधूने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकवारीत केलेल्या कामगिरीची इतिहात नोंद केली जाईल. कारण, बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकचे रौप्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.

वाचा: पी.व्ही.सिंधूची रौप्य पदकाची कमाई

अंतिम सामन्यात सिंधू आणि कॅरोलिनामध्ये चुरशीचे द्वंद्व पाहायला मिळाले असले तरी सामना संपल्यानंतर सिंधूने आपल्यातील खेळ भावनेचे दर्शन घडवले. तिसऱया गेमचा निर्णायक गुण जिंकल्यानंतर मारिन कोर्टवरच खाली बसली. त्यावेळी तिने हातातील रॅकेट देखील खाली टाकले होते, तर कडवी झुंज देऊनही सामना हातातून निसटल्याने सिंधू देखील हताश होऊन बॅडमिंटन कोर्टवरच खाली बसली होती. मग सिंधूने पराभवातून स्वत:ला सावरले आणि ती थेट उठून कॅरोलिनाकडे गेली.

वाचा: सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईनंतर शोभा डे म्हणाल्या..

सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिनाला उभं करून तिची गळाभेट घेऊन अभिनंदन केले, तर मारिननेही सिंधूच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर मारिन बॅडमिंटन कोर्टवर विजयाच्या जल्लोषात व्यस्त होती. इतक्यात बॅडमिंटन कोर्टवरून माघारी परतत असताना पी.व्ही.सिंधूचे लक्ष कोर्टवरच खाली पडलेल्या कॅरोलिना मारिनच्या रॅकेटकडे गेले. कॅरोलिना विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त असल्याचे पाहून सिंधूने खेळ भावना जपत बॅडमिंटनर कोर्टवर एकटे पडलेले कॅरोलिनाचे रॅकेट उचलून तिच्या बॅगेजवळ योग्य जागी नेऊन ठेवले. पी.व्ही.सिंधूने केलेली ही कृती तशी किरकोळ किंवा त्याकडे कुणाचे तसे फारसे लक्ष जरी गेले नसले तरी सिंधू आपल्या खेळाचा आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचा देखील किती आदर करते याचे प्रचिती तिच्या कृतीतून नक्कीच आली. पी.व्ही.सिंधूने तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या रॅकेटलाही योग्य मान दिला.