रशियन खेळाडूंवर बंदी घालण्याच्या निर्णयाबाबत ठाम असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अचानक रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना झुकते माप देत उत्तेजकांपुढे लोटांगण घातले आहे.

रशियाने २०१४ मध्ये अब्जावधी डॉलर्स खर्च करीत हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली होती. पुतिन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेद्वारे रशिया पुन्हा जगात सर्वोच्च स्थानाकडे झेप घेत आहे हे दाखवून दिले होते. रशियन खेळाडूंवर बंदीची कारवाई केल्यास खूप महागात जाईल असे अप्रत्यक्षरीत्या सांगत पुतिन यांनी खेळाडूंवरील कारवाई खूपच कमी करण्यात यश मिळविले.

पुतिन यांच्या दबावाखाली आयओसीचे पदाधिकारी झुकले व ते कोणत्या रशियन खेळाडूंना आगामी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी देता येईल याचाच विचार करीत आहेत. साहजिकच आगामी ऑलिम्पिकमधील उद्घाटन सोहळय़ात रशियन खेळाडू संचलनात सहभागी होणार हे स्पष्ट झाले आहे.

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले, रशियन खेळाडूंवर सरसकट बंदी घालणे अन्यायकारक होणार आहे. खेळाडूंचे हित लक्षात घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला आहे.

रशियन ऑलिम्पिक समितीचे पदाधिकारी जिनादी अलीयोशिन यांनी सांगितले, आम्हाला आयओसीकडून हा निर्णय अपेक्षित होता.

आयओसीचा हा निर्णय म्हणजे जागतिक क्रीडा क्षेत्रात स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना चपराकच आहे, असे अमेरिकन ऑलिम्पिक महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.