आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या खेळाडूंच्या आयोगासाठी झालेल्या निवडणुकीत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अपयशी ठरली. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या आयोगावर येलेना इसिनाबायेवाला (रशिया), तलवारपटू ब्रिटा हिडेमन (जर्मनी), टेबल टेनिसपटू रियू सेयुंगमिन (दक्षिण कोरिया) आणि जलतरणपटू डॅनियल ग्युएर्टा (हंगेरी) यांची निवड झाली आहे.

या आयोगावर एकूण चार खेळाडूंची निवड केली जाणार होती. त्यासाठी जगातील सर्वोत्तम २३ खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडानगरीमध्ये गेले २५ दिवस हे मतदान चालले होते. निवडण्यात आलेल्या चार सदस्यांची आयओसीवर आठ वर्षांकरिता नियुक्ती केली जाणार आहे. हिडेमनला सर्वाधिक १ हजार ६०३ मते मिळाली. त्याखालोखाल सेयुंगमिन (१५४४), ग्युएर्टा (१४६९) व येलेना (१३६५) यांना मते मिळाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या ११ हजार २४५ खेळाडूंपैकी ५ हजार १८५ खेळाडूंनी मतदानात भाग घेतला. या चार सदस्यांची क्लाउडिया बोकेल, देई सुंग मून, अ‍ॅलेक्झांडर पोपोव व युमिलिका रुईझ यांच्या जागी नियुक्ती केली जाणार आहे. सायनाला १२३३ मते मिळाली.