साक्षीच्या आईचे नवे घोषवाक्य

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ही घोषणा भारतीयांसाठी परवलीचीच. पण ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकच्या आईने ‘बेटी बचाव, बेटी खिलाआ’ म्हणजेच ‘मुली वाचवा, मुलींना खेळू द्या’  असा संदेश दिला.

‘‘साक्षीची कामगिरी ही भारतातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे या विजयामुळे अजून बऱ्याच मुलींनी खेळाकडे वळावे आणि भारताचे नाव उज्ज्वल करावे. साक्षीचा आम्हाला अभिमान वाटतो,’’ असे मत साक्षीची आई सुदेश मलिक यांनी व्यक्त केले.

साक्षीची आई पुढे म्हणाली की, ‘‘जेव्हा साक्षीने कुस्ती खेळायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी आमचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. साक्षीसारख्या मुलीला कुस्ती खेळायला का पाठवता? कुस्तीमध्ये भरपूर मेहनत करावी लागते, ते तिला जमणार नाही, असे म्हणायचे. पण आम्ही तिला नेहमीच पाठिंबा दिला. आता २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदक पटकायला हवे.’’

कोणत्याही खेळाडूसाठी पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. हा पाठिंबा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला आमचे मानसिक खच्चीकरण करणारी माणसे आता आमचे अभिनंदन करत आहेत. साक्षीकडून अन्य मुलींनी प्रेरणा घ्यायला हवी. त्याचबरोबर मुलींच्या वडिलांनीही त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पदक जिंकल्यावर साक्षी म्हणाली की, ‘मी तुमची इच्छा पूर्ण केली. तेव्हा आनंदाश्रूंना मी वाट मोकळी करून दिली.’

– सुबीर मलिक, साक्षीचे बाबा