ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवनप्रकरणी सबळ पुराव्याविना आमच्यावर दोषारोप करणे चुकीचे आहे, असे मत सुशील कुमारचे प्रशिक्षक आणि सासरे सत्पाल सिंग यांनी व्यक्त केले. आमच्याविरोधातील सर्व आरोप तथ्यहीन असून याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असेही सत्पाल यांनी स्पष्ट केले.

‘सत्पाल आणि सहयोगींनी नरसिंगचे उत्तेजक प्रकरण घडवून आणले असे भासवले जात आहे. पण आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ठोस पुरावे असतील तर समोर या,’ असे आवाहन सत्पाल यांनी केले.

ते पुढे म्हणाले, ‘नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. अचानक सुशील आणि माझे नाव कुठून आले? नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे वृत्त आले तेव्हा मला वैयक्तिक अतिशय वाईट वाटले. कारण मला देशासाठी पदक हवे होते. खेळाडू काय आहार घेतोय ही खेळाडू, प्रशिक्षक आणि महासंघाची जबाबदारी आहे. पुरावे नसताना कटकारस्थान रचले, असे म्हणणे चुकीचे आहे’.

‘नरसिंगविरोधात कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व नाही. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सर्वोत्तम कुस्तीपटूने प्रतिनिधित्व करावे या विचारातून नरसिंग निवडीनंतर न्यायालयात दाद मागितली होती. नरसिंगला रोखण्यासाठी न्यायालयात गेलो नाही. न्यायालयाने नरसिंगच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर तो विषय संपला. भारताला पदक मिळावे एवढीच आमची इच्छा आहे. म्हणूनच उच्च न्यायालयात दाद मागितली नाही,’ असे सत्पाल यांनी सांगितले.

योगेश्वर दत्तचा नरसिंगला पाठिंबा

ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तने उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळलेल्या नरसिंग यादवला पाठिंबा दर्शविला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. ‘कुस्तीत असे घडल्याने खूप दु:खी आहे. या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. नरसिंग असे करू शकत नाही, हा मला विश्वास आहे,’’ असे मत योगेश्वरने ट्विटरवरून व्यक्त केले.