ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजनासाठी आणखी चार वर्षे बाकी असली, तरी येथे ऑलिम्पिक ध्वजाचे आगमन झाल्यानंतर संयोजकांच्या उत्साहाला उधाण आले. २०२० मध्ये येथे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

गव्हर्नर युरिको कोईको यांचे ब्राझीलहून आगमन झाल्यानंतर हानेदा विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कोईको यांनी हा ध्वज ब्राझीलचे महापौर एडवर्ड पेस यांच्याकडून स्वीकारला होता. कोईको यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, पन्नास वर्षांनंतर या शहरात ऑलिम्पिक ध्वजाचे आगमन झाले आहे. आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. यापूर्वी आपण १९६४ मध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या वेळी आपला देश महायुद्धाच्या छायेतून सावरण्याच्या स्थितीतून जात होता. आता जगातील आर्थिकदृष्टय़ा सक्षम देशांमध्ये आपले स्थान आहे.

पंतप्रधान शिंझो अबे यांनी सांगितले की, ‘दिवसेंदिवस ऑलिम्पिकसाठी होणाऱ्या खर्चात वाढ होणार आहे. स्पर्धेसाठी अंदाजपत्रकात खूप वाढ होणार असली, तरी त्याची झळ सामान्य लोकांना बसणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.’

ऑलिम्पिक स्पर्धा येथे आयोजित करण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेण्यात आल्यानंतर येथील संयोजकांनी संभाव्य खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र विविध भांडवली खर्चात अपेक्षेपेक्षा जास्तच वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे येथील संयोजकांना पुन्हा नव्याने अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे.

टोकिओ शहराला संयोजनपद देताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार करीत फ्रान्समधील काही संघटकांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘शांतता, विश्वासार्हता, सुरक्षित व स्थैर्य असलेले हे शहर आहे, ही गोष्ट पुढे करीत येथील संयोजकांनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी सातत्याने ब्राझीलमधील राजकीय अस्थिरतेमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तेथील गुन्हेगारीचा मोठा फटका परदेशी खेळाडू, संघटक व पर्यटकांना बसला होता. या पाश्र्वभूमीवर येथे दिमाखदारपणे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाईल,’ असा आत्मविश्वास येथील संयोजकांना आहे.