शंभराहून अधिक खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय पथकाने रिओ ऑलिम्पिकमध्ये फक्त दोन पदकांची कमाई करून निराशा केली. यातून धडा घेत २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी करायला हवी, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि कुस्तीपटू साक्षी मलिक या पदकविजेत्यांचे अभिनंदन करताना गोयल म्हणाले, ‘‘अभिनव बिंद्रा, दीपा कर्माकर आणि सानिया मिर्झा यांची पदके थोडक्यात हुकली. चार वर्षांनंतर टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची संख्या वाढेल अशी आशा आहे.’’

‘‘सर्व खेळाडूंना ‘टॉप’ योजनेंतर्गत उत्तम प्रशिक्षण देण्यात आले. परदेशी वातावरणात परदेशी प्रशिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ११८ खेळाडू रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकले. पुढील ऑलिम्पिकमध्ये हा आकडे दोनशेपर्यंत जाईल,’’ अशी अपेक्षा गोयल यांनी प्रकट केली.