आनुवंशिक उत्तेजकांचा विळखा समुद्रसर्पापेक्षाही धोकादायक असल्याचे मत स्वित्र्झलडमधील उत्तेजक विश्लेषण चाचणी प्रयोगशाळेचे माजी संचालक मार्शल सॉगी यांनी व्यक्त केले. ल्युसान येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुख्यालयाच्या नजीकच ही प्रयोगशाळा आहे. जागतिक स्तरावरील खेळांना असलेला उत्तेजकांचा विळखा कमी करणे या प्रयोगशाळेचे उद्दिष्ट आहे.

उत्तेजक सेवनकर्त्यां खेळाडूंनी नवनवीन क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. जेणेकरून उत्तेजक चाचणीतून सहजपणे सुटता येईल. हे टाळण्यासाठी जगभरातल्या उत्तेजक संदर्भातील प्रयोगशाळांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करीत अद्ययावत राहणे अत्यावश्यक आहे, असे सॉगी यांनी सांगितले. सरकारपुरस्कृत उत्तेजक सेवन प्रकरणाने रशिया मुख्य धोका असल्याचे सिद्ध झाले आहे. आनुवंशिक उत्तेजकांवर लक्ष केंद्रित झाले असतानाच छोटय़ा स्वरूपातील उत्तेजक सेवन प्रकरणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा सॉगी यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शरीरातील गुणसूत्रांमध्ये बदल करीत शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी संशोधन करीत आहेत. स्नायू बळकट करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरू शकते. क्रीडापटूंनी हा मार्ग अवलंबल्यास उत्तेजकविरोधी चळवळीला धक्का बसू शकतो, असेही सॉगी यांनी सांगितले. आनुवंशिक उत्तेजक हा विषय गंभीर असून १९९९ मध्ये उत्तेजकविरोधी संघटनेच्या स्थापनेपासून या संदर्भात चर्चा सुरू आहे. आनुवंशिक उत्तेजकांचा विषय जटिल आहे, मात्र चांगल्या कामगिरीसाठी खेळाडू हा मार्ग अजमावू शकतात, असे सॉगी यांनी सांगितले.

‘प्रभावी उत्तेजकांचा समावेश असलेल्या औषधाचे छोटय़ा प्रमाणातील सेवनही परिणामकारक असल्याचे क्रीडापटूंच्या लक्षात आले आहे,’ असे मत सॉगी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘खेळप्रतिमेला बट्टा लावणाऱ्या खेळाडूंना शोधून काढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता येऊ शकतो.’