भारताचा मल्ल नरसिंग यादवच्या ऑलिम्पिक सहभागाबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी होणार आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीपुढे शनिवारी तब्बल आठ तास चर्चा झाली आणि याबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ शिस्तपालन समितीने या प्रकरणावर पुन्हा एकदा विचार केला. या प्रकरणाबाबत त्यांनी सखोल अभ्यास केला. या प्रकरणाचा अंतिम निर्णय सोमवारी दुपारी चार वाजता जाहीर केला जाईल. या प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी समितीला बऱ्याच कागद पत्रांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर दोन्ही पक्षांनी सविस्तरपणे आपली बाजू मांडली. त्यामुळे शनिवारऐवजी सोमवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे,’ असे ‘नाडा’चे महासंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी यावेळी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

नरसिंगची दोन वेळा उत्तेजक चाचणी घेण्यात आली आणि दोन्ही वेळा तो दोषी आढळला. पण माझ्याबाबत हा कट रचल्याचे नरसिंगने सांगितले होते. याप्रकरणी त्याने पोलीस स्थानकात तक्रारही नोंदवली असली, तरी त्याच्याकडे कोणतेही सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आता नरसिंग प्रकरणात शिस्तपालन समिती काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

क्रीडानिवासातील आगीचा धसका

पीटीआय, रिओ डी जानिरो

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना येथे आल्यापासून सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ते राहत असलेल्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीमुळे त्यांच्यावर निवासस्थान काही वेळापुरते सोडण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियन संघाचे प्रवक्ते माइक टान्करेड यांनी सांगितले, आमचे खेळाडू राहत असलेल्या इमारतीमधील तळघरात असलेल्या पार्किंगमध्ये छोटी आग लागली. त्यामुळे इमारतीमधील जिन्यांवर धुराचे लोट येऊ लागले. या धुराचा त्रास होऊ लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या शंभर खेळाडू व पदाधिकाऱ्यांना काही वेळ इमारतीबाहेर जावे लागले. सुदैवाने ही आग पार्किंग भागापुरतीच मर्यादित होती त्यामुळे कोणासही इजा झाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी याआधी अस्वच्छ स्वच्छतागृहे, खोल्यांमधील पाणी व गॅस गळती, शॉर्टसर्किट याबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी सुरू केल्या आहेत. दरम्यान, येथील महापौर एडवर्ड पेस यांनी ऑस्ट्रेलियन पथकाचे प्रमुख किटी चिल्लर यांची भेट घेऊन झालेल्या गैरव्यवस्थेबाबत दिलगिरी व्यक्त केली.